मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीने ‘सिडको'ला लावला चुना
कार्मिक विभागाने मागवले कंपनीकडून स्पष्टीकरण
नवी मुंबई : ‘सिडको'ला बाह्य एजन्सीद्वारे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी पुरवणाऱ्या कंपनीने तब्बल ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेले ६-८ महिन्यांची ‘भविष्य निर्वाह निधी'ची रक्कम (प्रॉव्हिडंट फंड) पीएफ ऑफिसला जमा केली नसल्याची तक्रार ‘सिडको'ला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ'ची रक्कम संबंधित कंपनी ‘सिडको'कडून मात्र दर महिन्याला वसूल करत आहे. दीड वर्षापूर्वी कार्मिक विभागात झालेल्या बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यानंतर ‘सिडको'ला मनुष्यबळ पुरविणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपन्यांची चालबाजी समोर आल्याने ‘सिडको'मध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
याप्रकरणी ‘सिडको'ला तक्रार प्राप्त झाल्यामुळे ‘सिडको'च्या कार्मिक विभागाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या विशाल एक्सपर्ट या कंपनीकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ'चे लाखो रुपये ‘सिडको'कडून उकळणाऱ्या संबंधित कंपनीचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बील ‘सिडको'ने स्थगित केल्याची माहिती सिडको सुत्रांनी दिली.
विशेष म्हणजे सदर कंपनी ‘सिडको'कडून दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम उचलताना बिलासोबत कर्मचाऱ्यांचा पीएफ भरल्याचे चलन वेतन बिलासोबत जोडत असल्याने ‘सिडको'चे अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे संबंधित कंपनी वेतन बिलासोबत बोगस चलन तर सादर करत नाही ना? याचीही शहानिशा सिडको पुणे येथील पीएफ कार्यालयाकडून करणार असल्याचे सांगितले जात आहे. सदर कंपनी पुणे येथील नोंदणीकृत आहे.
‘सिडको'ला मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी ६० टक्के पदे रिक्त असल्यामुळे अनेक कंपन्यांद्वारे ‘सिडको'मध्ये मनुष्यबळ आऊटसोर्स केले जात आहे. या आऊटसोर्स कंपन्यांद्वारे ‘सिडको'त कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ ते २० हजार रुपये वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या त्या वेतनातून ‘पीएफ'ची रक्कम कापून कंपनी त्या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करते.
दरम्यान, संबंधित कंपनी त्या कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ'ची रक्कम ‘सिडको'कडून पूर्ण वसूल करुन सुध्दा पीएफ कार्यालयात जमा करत नसल्याची तक्रार ‘सिडको'ला प्राप्त झाली. सदर तक्रारीची दखल घेऊन कार्मिक विभागाने विशाल एक्सपर्ट या आऊटसोर्स कंपनीकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
दरम्यान, दीड वर्षापूर्वी देखील ‘सिडको'मध्ये बोगस कर्मचारी वेतन घोटाळा उघडकीस आला होता. ‘सिडको'चा तत्कालीन सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया याने तब्बल २९ बोगस कर्मचारी ‘सिडको'त कार्यरत असल्याचे दाखवून त्यांच्या नावे काढलेल्या सुमारे ३ कोटी रुपये वेतनाची रक्कम वेगवेगळ्या बँकेत जमा करुन ते परस्पर हडप केल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे सागर तपाडिया विरोधात ‘सिडको'ने गुन्हा दाखल करुन त्यास बडतर्फ केले आहे.