नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट
बदलापूरः बदलापूर पश्चिम भागातील इमारतीच्या आवारातील हातगाडीमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन या भागात साफसफाई करणारा कामगार जखमी झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटाच्या हादऱ्याने ज्या इमारती समोरच्या मोकळ्या जागेत सदर हातगाडी उभी होती, त्या इमारतीतील अनेक घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
१० डिसेंबर रोजी म्हात्रे चौक परिसरात सदर स्फोट झाला. या भागात नामदेव प्लाझा नावाची इमारत आहे. इमारतीच्या मोकळ्या परिसरात नीरज साहा साफसफाई करीत होता. मोकळ्या जागेतील कचरा आणि पालापाचोळा गोळा केल्यानंतर त्याने तो पेटवला. याच परिसरात अनेक टपऱ्या आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. यातील एक हातगाडी जाळलेल्या कचऱ्या शेजारीच होती. कचरा पेटवल्यानंतर काही क्षणात या हातगाडीचा स्फोट झाला. सदरची हातगाडी नेमकी कोणाची याची माहिती कळू शकली नाही. मात्र, या स्फोटात नीरज साहा जखमी झाला. घटनेनंतर त्याच्यावर शेजारच्या खासगी दवाखान्यात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे असलेल्या काही अंशी आगीची झळ बसलेल्या टपऱ्या आणि आसपासच्या भागात पाणी मारले. सिलेंडर स्फोटाने नामदेव प्लाझा या इमारतीतील अनेक घरांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. स्लाईडिंग सह खिडक्यांच्या काचा घरात तुटून पडल्याने इमारतीच्या आवारात काचांचा खच पडला होता. दरम्यान, या स्फोटानंतर बेकायदा टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.