शिवसैनिकांचा संवाद मेळावा संपन्न
नवी मुंबई : वाशी येथे बेलापूर विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने यश प्राप्त करण्यासाठी कश्याप्रकारे रणनीती आखावी याबाबत जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी संवाद साधला.तसेच ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याबाबत पक्षाचे नेते सकारात्मक असल्याचे सूतोवाच केले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पक्षाचे संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्यावर दिली. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर देखील त्यांनी महायुतीचा धर्म म्हणून मोठ्या शिताफीने प्रचाराची धुरा सांभाळून वाशी प्रभागातून आमदार मंदा म्हात्रे यांना आघाडी मिळवून दिली होती.सदरची आघाडी नेरूळपर्यंत टिकल्याने लक्ष्यवेधी लढतीत मंदा म्हात्रे यांचा विजय झाला यावर किशोर पाटकर यानी प्रकर्षाने लक्ष वेधले.
आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यासाठी आणि पक्षापासून काही काळ दूर राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कंबर कसली असून निवडणुकीच्या दृष्टीने पाटकर यांनी एक पाऊल पुढे टाकत आघाडी घेतली असून संवाद सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मनपा निवडणुकीच्या रिंगणात असणारी प्रमुख आव्हाने,त्यासाठी कश्याप्रकारे लढा द्यावा लागेल, आपण त्यासाठी किती सक्षम आहोत किंवा नाही याबाबत प्रत्येक उमेदवाराने आत्मपरीक्षण करणे आणि त्यादृष्टीने कामाला लागावे याबाबत पाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनपा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वैयक्तिक माहिती स्वरूपातील पक्षाने दिलेला नमुना माहिती अर्ज भरून द्यावा ,त्यानुसार सदर इच्छुकांची चाळणी पक्षाचे वरिष्ठ नेते करतील आणि कुणाला कोणते पद द्यायचे,कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूचित केले.
यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, रामचंद्र पाटील, विसाजी लोके, सौरभ शिंदे, क्महेश कुलकर्णी, विजय माने, निता गावडे ,गणेश पावगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सावंत यांनी केले.
यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यावतीने पाटकर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.