खारघर टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद
खारघर : सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे खारघर टोल नाक्यावर उभारण्यात आलेले स्वच्छतागृह बंद असल्यामुळे प्रवाशी वर्गात नाराजी पसरली आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्यामुळे सहा महिन्यापूर्वी स्वच्छतागृहाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आले होते. पुणे येथून येताना खालापूर नंतर खारघर येथे टोलनाका असल्यामुळे बहुतांशी प्रवाशी लघुशंकेसाठी टोलनाक्यावर थांबतात. मात्र, नुतनीकरणाचे काम पूर्ण होवून जवळपास तीन महिने झाल्यानंतरही स्वच्छतागृह बंद असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खारघर टोलनाक्यावरील स्वच्छतागृह गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खारघर टोलनाक्यावरील स्वच्छतागृह सुरु करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. लवकरात लवकर खारघर टोलनाक्यावरील स्वच्छतागृह सुरु न केल्यास मनसे तर्फे आंदोलन केले जाणार आहे. - गणेश बनकर, पदाधिकारी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
खारघर टोलनाक्यावरील स्वच्छतागृह शेजारी किरकोळ काम अपूर्ण असून १२ डिसेंबर २०२४ पासून स्वच्छतागृह सुरु केले जाणार आहे. - ओमप्रकाश पवार, कार्यकारी अभियंता - सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई.