खारघर मधील सेंट्रल पार्क मध्ये कोल्ह्याचा खुलेआम वावर
खारघर : वनसंपदेच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला असून, वन्यजीवांचे हक्काचे घर सुरक्षित राहिलेले नाही. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे खारघर मधील रस्त्यावर तसेच खाडीकिनारा, खारघर मधील सेंट्रल पार्क परिसरात खुलेआम वावर करीत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. दरम्यान, रस्ता पार करताना कोल्ह्याचा अपघात होण्याची भीती असल्यामुळे प्राणी प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर शहर खाडीकिनारा आणि डोंगराच्या पायथ्याशी वसले असून, काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल असलेल्या खारघर डोंगरात कोल्हा, लांडगा, वाघ, सिंह आदी प्राणी वास्तव्य करीत होते. एवढेच नव्हेतर खारघर डोंगर माथ्यांवर असलेल्या फणसवाडी, चाफेवाडी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांच्या शेळी, बकरी रात्रीच्या वेळी वाघानी शिकार केल्याचे ग्रामस्थ सांगतात.
दरम्यान, निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाणारे खारघर शहर सिडकोकडून विकासाचे काम हाती घेतल्यानंतर खारघर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्याने खारघर परिसरातील हिरवेगार डोंगर भकास झाले. त्यामुळे हळूहळू खारघर परिसरातील जंगली प्राण्यांचे प्रमाण खूप कमी झाले. गेल्या तीन-चार वर्षांपासून खारघर सेन्ट्रल पार्क मधील पाणथळ तसेच खाडी किनारी वन्यजीव खुलेआम वावर करीत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी खारघर सेक्टर-१५ मधील रस्त्यावर सुवर्णकोल्हा मृतावस्थेत आढळला. तर मागील वर्षी कोल्ह्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले होते.
नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने वारंवार नागरी वस्तीमध्ये वन्यजीव दिसण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही वर्षात खाडीकिनारा लगत खोदकाम केले जात असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाटीकरण केले जात आहे. तर मच्छीमारांनी खाडीकिनारा शेड उभारले असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे खारघर खाडीकिनारा आणि सेंट्रल पार्क लगत असलेले रस्ते आणि पदपथावर निदर्शनास येत आहेत. त्यामुळे कोल्हा या वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे प्राणी प्रेमी नाराजी व्यवत करीत आहेत.
खारघर परिसरात श्वान प्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. ‘सिडको'ने खारघर मध्ये उभारलेल्या सेंट्रल पार्क आणि भगवती टॉवर, इस्कॉन मंदिरच्या मागील बाजूस उद्यान असून, उद्यानाच्या दोन्ही बाजूचा अविकसित परिसर झाडाझुडुपांनी वेढला आहे. विशेष म्हंणजे या उद्यानात सायंकाळी श्वान प्रेमी श्वानाला घेवून येत असल्यामुळे सदर उद्यान ‘डॉग गार्डन' म्हणून ओळखले जातो. विशेष म्हणजे बहुतांश श्वान प्रेमी चिकन, मटण आदी आहार श्वानाना या ठिकाणी खाऊ घालतात. या ठिकाणी चिकन, मटण मांस प्राप्त होत असल्यामुळे येथील झाडाझुडूपात कोल्हे वावर करीत असल्याचे खारघर मधील अनेक नागरिकांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी खारघर सेक्टर-१५ मध्ये एक कोल्हा मृत अवस्थेत मिळाला होता. वन विभागाने सदर कोल्ह्याचे पनवेल येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात शव विच्छेदन केले असता,सदर कोल्ह्यास मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सायंकाळी सेंट्रल पार्क परिसरात चालण्यासाठी गेलो असता ‘डॉग गार्डन' लगत असलेल्या रस्त्यावर दोन ते तीन वेळा कोल्हा निदर्शनास आला. उद्यानात श्वानास दिले जाणारे खाद्य प्राप्त होत असल्यामुळे झाडाझुडपात कोल्हे वास्तव्य करीत असावेत. मात्र, आठ दिवसापासून उद्यानाला लागून असलेल्या झाडाझुडपाची छाटणी करून जमीन सपाटीकरण केले जात असल्यामुळे कोल्हे रात्री रस्त्यावर फिरत असावेत. - सचिन राजपूत, रहिवाशी - खारघर.
खारघर मधील खाडीकिनारी अतिक्रमण होत असल्यामुळे खारघर परिसरात कोल्हा रस्त्यावर दिसून येत असून, कोल्हा आणि इतर वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. - सीमा टंक, पशु प्रेमी - खारघर, नवी मुंबई.