अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा
ठाणे : समाजात अंमली पदार्थांचा वापर टाळण्यासाठी आणि युवा पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे. ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, परदेशातून येणारी पार्सल, गांजाची लागवड होणारी ठिकाणी आदिंवर लक्ष ठेवून वारंवार तपासणी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी दिले आहेत.
‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कृती समिती'ची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी ठाणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक अमर मराठे, ‘नशाबंदी मंडळ'चे रविंद्र गुरचळ यांच्यासह अन्न-औषध प्रशासन, कृषि, टपाल विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग, शिक्षण विभाग, वन विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे ग्रामीण पोलीसांनी सन २०२४ मध्ये सुमारे २.३७ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. तर मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुध्द एकूण १४७ गुन्हे दाखल केले असून १७७ आरोपींना अटक केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानेही अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कडक पावले उचलली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, समाजातील अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच ग्रामीण भागात जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. माने यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी बंद कारखाने, गोडावून, रासायनिक कंपन्या, व्यसनमुक्ती केंद्रे यांची तपासणी करुन अहवाल सादर करावा. ज्यांच्याविरुध्द एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत, अशांची माहिती एकत्रित करुन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या परदेशी नागरिकांवर विशेष लक्ष ठेवावे. तसेच कुरिअर, टपालामार्फत बाहेरुन येणाऱ्या पार्सलची तपासणी करण्यात यावी. - डॉ. संदीप माने, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे.