पावणे मधील आदिवासींची पाण्यासाठीची पायपीट कायम

वाशी : पावणे आदिवासी पाड्यात नवी मुंबई महापालिका मार्फत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असतानाही एमआयडीसी मार्फत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पावणे आदिवासी पाड्यातील रहिवाशांना गळक्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असून, त्याकरिता मोठी पायपीट करावी लागत आहे.

पावणे आदिवासी पाड्यातील आदिवासींना पाण्याअभावी वणवण करावी लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी नवी मुंबई महापालिका मार्फत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, एमआयडीसी मार्फत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने येथील रहिवाशांना गळक्या पाण्यावर स्वतःची तृष्णा भागवावी लागत आहे.

मागील काही वर्षांपासून पाण्याच्या भीषण टंचाईला पावणे येथील आदिवासीना सामोरे जावे लागते. नळ आहेत पण दिवसभर कोरडे रात्री. रात्री २ वाजल्यानंतर पाणी येते. त्यावेळी पावणे येथील आदिवासीना पाणी भरावे लागते. तसेच पाण्याच्या टाकीत जमा होणारे पाणी दिवसभर तुटपुंजे वापरावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून तर हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण केले तरच पाणी नाही तर रिकाम्या भांड्यांचे दर्शन घडले जाते. मध्यरात्री दोन वाजता येणारे पाणी सकाळी सहा वाजेपर्यंतच येते, त्यानंतर पाणीच येत नाही. नवी मुंबई महापालिकेने वाल्मिकी आवास योजेअंतर्गत पावणे येथील आदिवासींना घरे बांधून दिली होती.पाण्याची व्यवस्था नसतानाही सहा ते सात वर्षांपूर्वी महापालिकेने पावणे एमआयडीसी मधील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर घाईघाईने वाल्मिकी आवास योजना अंतर्गत बांधलेल्या घरकुलात केले. याठिकाणी पाण्याची टाकी आहे. याशिवाय प्रत्येकाच्या घराघरात नळजोडणी देखील देण्यात आलेली आहे. पण, पाणीच नव्हते. गेल्या सहा महिन्यापूर्वी पावणे आदिवासी पाड्यात नवी मुंबई महापालिका मार्फत नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. मात्र, एमआयडीसी मार्फत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने दिवसा या ठिकाणी पाण्याचे  दर्शन दुर्लभ झाले आहे. या ठिकाणी रात्री  नंतर पाणी येते. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी  जुना वारली पाडा नाहीतर शालिमार कंपनी जवळ फुटलेल्या जलवाहिनीचा आधार पावणे येथील आदिवासींना घ्यावा लागत आहे. याठिकाणी पाणीपुरवठा  सुरळीत व्हावा म्हणून नवी मुंबई महापालिकेने नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत. मात्र, येथील पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत असल्याने त्याचा दाब कमी असतो. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, अशी माहिती तुर्भे पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने  आमची फसवणूक केली. घर देताना पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे नवी मुंबई महापालिकेने सांगितले होते. मात्र, अवघे काही दिवस पाणी मिळाले. त्यानंतर ‘येरे माझ्या मागल्या' सुरु झाले. त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागणीकडे गांभिर्याने लक्ष देऊन पावणे आदिवासी पाडा मधील पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची गरज आहे. आजही पावणे आदिवासी पाडा मधील रहिवाशांना पाण्यासाठी दीड किलो पायपीट करावी लागते. याशिवाय रोज मध्येरात्री पाण्यासाठी जागून पाणी भरावे लागते. - कृष्ण वड, अध्यक्ष - वारली पाडा घर बचाव समिती, पावणे, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील यमुनाई फाउंडेशनचा राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार सोहळा साजरा