विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप नेते ॲड. राहुल नार्वेकर यांची ९ डिसेंबर रोजी एकमताने निवड करण्यात आली आहे. ॲड. राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मांडला होता.

हंगामी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करीत सभागृहाची परंपरा जपण्याच्या आणि निःपक्षपातीपणे कामकाज चालवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

त्याआधी  उर्वरतित नवनिर्वाचित आमदारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पवार आणि शिंदे यांची सभागृहात ओळख करून दिली.

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४'मध्ये ‘महायुती'ला बहुमत मिळाल्यावर ‘महायुती'चे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेनंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकतता होती. मात्र, ८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच दोघांमधील साम्य सांगत असतानाच ‘राहुल नार्वेकर पुन्हा येतील, असे म्हटले नव्हते तरीही आले...' असे वक्तव्य केले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या निवडीला समर्थन दिल्याबंद्दल विरोधी पक्षाचे देखील आभार मानले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून ती परंपरा यंदाही कायम राहिली. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्या तिघांमधील एक वकील होता. मात्र, आता ॲड. नार्वेकर यांच्या रुपाने आणखीन एक वकील विधानसभेत आहे. तसेच ॲड. राहुल नार्वेकर पहिलेच अध्यक्ष आहेत, जे पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते दुसऱ्यांदाही अध्यक्ष झाले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राहुल नार्वेकर यांनी ‘विधान परिषद'मध्ये काम केले आहे. अनेकदा कायद्यावर भाषण करताना राहुल नार्वेकर विधान परिषद सदस्य म्हणून बारकावे शोधून काढत त्यावर बोट ठेवण्याचे काम ते करीत होते. कायदेमंडळाचा अध्यक्ष असल्यावर त्याला कायद्याचे बारकावे माहीत असणे महत्त्वाचे असते. मागची ५ वर्षे संक्रमणाचा काळ होता. यात ज्या घडामोडी घडल्या त्यात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांकडे माध्यमांचे लक्ष होते. कदाचित यात सर्वाधिक चर्चेत राहिलेले राहुल नार्वेकरच होते. त्यांच्या रुपाने पुन्हा एकदा न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडले गेले आहे हाच आनंदाची बाब असल्याचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक विधानसभा अध्यक्षांचा वाटा आहे, या मांदियाळीत राहुल नार्वेकर यांचे नाव जोडले जात आहे.  आपल्याला अडीच वर्षात एक अग्निपरीक्षाही द्यावी लागली. पण, एक अतिशय चांगल्या प्रकाराचे कार्य नार्वेकर यांनी  केले. पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत केवळ चारच लोकांना मिळालाय. यात कुंदन फिरोदिया, सयादी सिलम, बाळासाहेब भारदे यांचा समावेश असून आता यात ॲड. राहुल नार्वेकर यांचा देखील समावेश झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईसह राज्यातील कोळीवाड्यातील घरे, जागा कायमस्वरुपी करण्याची मागणी