आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी पाड्यावरील टळली कारवाई
खारघर : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मध्यस्थीने खारघर मधील अमनदूत रेल्वे स्थानक लगत असलेल्या खुटूकबांधण वाडीतील घरांवर ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून होणारी कारवाई थांबविण्यात आल्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.
खारघरच्या डोंगरावर फणसवाडी, चाफेवाडी तर डोंगराच्या पायथ्याशी बेलपाडा, हेदोरावाडी, धामोळे, घोलवाडी, कातकरी पाडा तसेच अमनदूत मेट्रो रेल्वे स्थानक लगत खुटूकबांधण आदि अदिवासी पाडे आहेत. या पाड्यात पूर्वी खारघर तसेच ओवे ग्राम पंचायतच्या माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असत. पनवेल महापालिका अस्तित्वात येताच या पाड्यात महापालिकेकडून नागरी सुविधा पुरविल्या जात आहे.
दरम्यान, खारघर मधील अमनदूत मेट्रो स्थानकालगत ‘कल्याण मेट्रो'चे स्थानक उभारण्यात येणार असल्यामुळे ‘सिडको'ने खुटूकबांधणवाडी या आदिवासी पाड्यातील रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी ‘सिडको'चे अधिकारी पाड्यात येताच रहिवाशांनी ‘भाजपा'चे खारघर उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विनोद घरत यांना त्याबाबत माहिती दिली.
विशेष म्हणजे या पाड्यातील ग्रामस्थांना पनवेल पंचायत समितीकडून घरकुल बांधून देण्यात आले आहे. ग्रामस्थांचे पुनर्वसन न करता कोणत्या आधारे कारवाई करीत आहात. ‘सिडको'कडून केल्या जाणाऱ्या विकासाला ग्रामस्थाचा विरोध नाही. मात्र, वर्षानुवर्षे घरे बांधून वास्तव्य करीत असलेल्या ग्रामस्थांना नोटीस पाठवून अधिकारी कारवाईची धमकी देत आहेत. घरे उध्वस्त झाल्यावर महिला, लहान मुले कुठे वास्तव्य करतील? याचा विचार ‘सिडको'ने केला आहेत काय? असा सवाल विनोद घरत यांनी उपस्थित केल्यामुळे सिडको अधिकारी माघारी फिरले.
अखेर ६ डिसेंबर रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची उभी घरे जमीनदोस्त केल्यास ग्रामस्थ कुठे वास्तव्य करतील? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील अमनदूत मेट्रो स्थानकापासून काही अंतरावर खुटूकबांधण वाडी आहे. या वाडीत १८ घरे आहेत. ‘सिडको'ने प्रथम घरे बांधून आदिवासी बांधवांचे स्थलांतर करणे आवश्यक असताना घरे खाली करण्याची नोटीस दिली दिल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, आ. प्रशांत ठाकूर यांनी ‘सिडको'च्या सह-व्यस्थापकीय संचालकांशी संपर्क साधून प्रथम पुनर्वसन आणि नंतर कारवाई करा, असे सांगितल्यामुळे कारवाई थांबिण्यात आली आहे. लवकरच ग्रामस्थ आमदारांसमवेत ‘सिडको'ला निवेदन देवून प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करणार आहे. - विनोद घरत, उपाध्यक्ष-भाजपा, खारघर.