‘नमुंमपा पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था'मध्ये शैक्षणिक प्रारंभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ‘पदव्यत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था'मध्ये पहिला विद्यार्थी दाखल झाला असून या पहिल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाने ‘संस्था'मध्ये शैक्षणिक प्रारंभ झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेची स्वतःची ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था' सुरु करण्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध परवानग्या प्राप्त होऊन सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांचीही परवानगी प्राप्त झाली होती. त्यानुसार राज्य विभागातर्फे स्त्री रोग विभागात पहिला विद्यार्थी दाखल झाला असून त्याद्वारे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था'मध्ये शैक्षणिक प्रारंभ झालेला आहे. उर्वरित विद्यार्थी यापुढील प्रवेश प्रक्रियेत दाखल होऊन सदर महाविद्यालय संपूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे महापालिकेला शक्य होणार असून महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग'मार्फत ‘नवी मुंबई महापालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था'ला पहिल्या टप्प्यात मेडिसीन (३ सीटस्‌), ‘ऑर्थोपेडीक (२ सीटस्‌), गायनेकोलॉजी (८ सीटस्‌), पिडीयाट्रीक (४ सीटस्‌) अशा ४ शाखांमध्ये १७ जागांची परवानगी प्राप्त झाली होती. आता विशेष म्हणजे ४ शाखांमध्ये आणखी भर घालत पाचव्या सर्जरी शाखा करिताही परवानगी प्राप्त झालेली असून सर्जरी शाखेत ४ जागांसाठी परवानगी मिळालेली आहे.
त्याचप्रमाणे मेडीसीन विभागात उर्वरित एका जागेचीही परवानगी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मेडीसीन विभागासाठी  आधीच्या ३ जागांसह नव्याने परवानगी मिळालेली १ अशा एकूण ४ जागांची परवानगी प्राप्त झालेली आहे. म्हणजेच नवी मुंबई महापालिकेने मागणी केलेल्या सर्वच्या सर्व पाचही शाखांमध्ये २२ जागांसाठी परवानगी प्राप्त झालेली आहे.

पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी ‘नमुंमपा'च्या वाशी आणि नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक आणि आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे.

सदर संस्थेमध्ये एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील आणि नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होणार आहे. याद्वारे महापालिका रुग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार आहे. परिणामी, नवी मुंबईकर नागरिकांना महापालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लाखो अनुयायांचे महामानवाला अभिवादन