‘महाराष्ट्र'मध्ये देवेंद्र पर्व
एकनाथ शिंदे, अजित पवार बनले उपमुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्राचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. मी, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेत स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम रचला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते फडणवीस महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर ‘महायुती'च्या कार्यकर्त्यांकडून गावा-गावात, वॉर्डावॉर्डासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोष केला.
नियोजित वेळ आणि तारखेनुसार शपथविधीचा महासोहळा मुंबईतील आझाद मैदान येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ना. नितीन गडकरी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपा नेते, बॉलिवुड मधील सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ‘राष्ट्रवादी'चे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत ‘महायुती'ने मोठा विजय मिळवला. ‘महायुती'ला राज्यात २३७ जागांवर यश मिळत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामध्ये १३२ जागांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे साहजिकच भाजप नेताच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, ते जवळपास निश्चित होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेन्स होता. अखेर एकनाथ शिंदे यांचीही नाराजी दूर झाल्याने त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘महायुती'चे सरकार स्थापन झाले असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते यापूर्वी २०१४, २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पद भूषविल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे राज्यातील दुसरे नेते आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस २०२२ साली शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण (२ वेळा), देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत.
शिंदे यांनी केले बाळासाहेबांचे स्मरण...
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवी आनंद दिघे यांचे स्मरण केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तसेच राज्यातील १३ कोटी नागरिकांचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेताना वडिलांसोबत त्यांच्या आईंच्या नावाचाही उल्लेख केला.
नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री...
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले असून एक बुथ कार्यकर्ता ते राज्याचे प्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. नागपूरच्या विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. त्यानंतर १९९९ मध्ये सर्वप्रथम आमदार बनून विधानसभेत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. मागील ५ टर्म म्हणजे २५ वर्षांपासून ते विधानसभेचे सदस्य असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता पदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची आणि अनुभवाची उंची मोठी आहे.