पर्यावरण पूरक शाडुच्या श्री गणेशमूर्ती बनविण्याचे आवाहन
कल्याण : पर्यावरण पूरक म्हणजेच शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन ‘पर्यावरण-प्रदुषण नियंत्रण विभाग'चे उपआयुक्त अतुल पाटील यांनी केले.
येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये असणाऱ्या माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील कारखानदार, मूर्ती विक्रेते, मूर्तीकार यांच्या समवेत महापालिका अधिकाऱ्यांची आचार्य अत्रे रंगमंदिरात बैठक पार पडली. त्यावेळी उपायुवत अतुल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
‘पीओपी'च्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत. परिणामी, जलस्त्रोतातील प्रदुषणात वाढ होवून पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्याकडील १२ मे २०२० रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार नदी, खाडीचे प्रदुषण आणि नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीओपी'च्या मूर्तींवर बंदी जाहीर केली आहे. या अनुषंगाने महापालिका क्षेत्रामध्ये ‘पीओपी' वापरावर (मूर्ती बनविणे) बंदी घालण्यासंदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीला ‘पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभाग'चे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, ‘पर्यावरण दक्षता मंडळ'च्या रुपाली शाईवाले, ‘पुनरावर्तन संस्था'च्या मयुरी कुंभार, मनुसृष्टी पर्यावरण समंत्रक वैशाली तांबट, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तीकारांना जागा आणि माती महापालिकेमार्फत विनामुल्य उपलब्ध दिली जाईल. सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण ७२ मूर्तीकारांना तसेच अनेक संस्थांना महापालिका मार्फत ५० टन शाडू मातीचे विनामुल्य वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती ‘पर्यावरण-प्रदुषण नियंत्रण विभाग'चे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
दरम्यान, ‘पुनरावर्तन संस्था'च्या मयुरी कुंभार तसेच ‘पर्यावरण दक्षता मंडळ'च्या रुपाली शाईवाले यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मनुसृष्टी पर्यावरण समंत्रक वैशाली तांबट यांनी सीपीसीबी गाईड लाईन्स, उच्च न्यायालयाच्या मनाईनुसार पीओपी बंदी, वायु प्रदुषण आणि जलप्रदुषण याबाबत सविस्तर माहितीवजा प्रेझेंटेशन सादर करुन मार्गदर्शन केले. यावळल उपस्थित असलेल्या मूर्तीकारांनी महापालिकेच्या सदरउपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला.
कल्याण प्रामुख्याने रेसिडेन्सीयल हब आहे. मुंबईत दररोज जाणारे असंख्य चाकरमानी कल्याण मध्ये राहतात. त्यामुळे येथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘पीओपी'च्या मूर्तीं बनविण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-अतुल पाटील, उपायुवत-पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभाग, केडीएमसी.