थंडीच्या धुक्यांचा गैरफायदा घेत वायुप्रदूषणात वाढ?
वाशी : मागील दोन दिवसांपासुन तापमानात घट झाली असून, धुक्यामुळे थंडीचा गारठा वाढला आहे. खैरणे, कोपरी भागात रात्री हवेत मोठ्या प्रमाणात धुके आढळून येत आहे. मात्र, रात्री पडणाऱ्या धुक्याचा गैरफायदा घेत एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांनी हवेत प्रदूषित वायू सोडण्याचा सपाटा लावला आहे. खैरणे, कोपरी या भागातील नागरिकांना रात्री दर्पवासाने श्वास घेण्यास त्रास होत होता. धुक्याच्या आडून वारंवार होणारे वायू प्रदूषण थांबवा अशी मागणी नागरीकांना मधून होत आहे. याशिवाय ‘नॅशनल एक्यूआय' नुसार नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता देखील ढासळत आहे.
नवी मुंबई शहरात महापे औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. घणसोली, कोपरखैरणे विभाग औद्योगिक पट्ट्याला लागूनच वसलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात होणाऱ्या प्रदूषणाचा फटका घणसोली, कोपरखैरणे या विभागांतील नागरिकांना अधिक होत असतो. सध्या वातावरणात गारवा वाढत असून, त्या थंडीच्या आडून कोपरी गाव, बोनकोडे, वाशी सेक्टर-२६ या परिसरात मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांना मळमळ वाटत असून, श्वास घेण्यास अडचण येत आहे. या भागात वाढणाऱ्या वायू प्रदूषण बाबत वारंवार तक्रारी करुनही ‘ये रे माझ्या मागल्या' परिस्थिती आहे. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम आणि समाधानकारक दाखविण्यात आलेला आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'च्या माध्यमातून नवी मुंबई शहरात हवा गुणवत्ता मोजमाप करणारी यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. बेलापूर-१४१ एक्यूआय, नेरुळ-१५१ एक्यूआय, कोपरी-वाशी-१८४ एक्यूआय, कोपरखैरणे-१३९ एक्यूआय आहे. यामध्ये नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता ढासळली असल्याचे निदर्शनास येत आहे. एमआयडीसी क्षेत्राला लागून वसलेल्या रहिवाशी क्षेत्रात रात्री हवेत अधिक प्रमाणात धूलिकण आढळत आहेत. याशिवाय हवेबरोबर येणाऱ्या उग्र वासामूळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेताना अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक
बेलापूर-१४१ एक्यूआय
नेरुळ-१५१ एक्यूआय
कोपरी पाडा, वाशी-१८४ एक्यूआय
कोपरखैरणे-१३९ एक्यूआय
नवी मुंबई मधील हवेची सध्याची गुणवत्ता?
पीएम २.५ मायक्रॉन अंतर्गत कण - ६४.४
पीएम १० मायक्रॉन अंतर्गत कण १३६.७
ओझोन ३३.९
नायट्रोजन डायऑक्साइड २३.१
सल्फर डायऑक्साइड ११.४
कार्बन मोनोऑक्साइड ९२०.०