‘पनवेल'चा आमदार होणार कोण?

नवीन पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात ५८.६३ टक्के मतदान झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पनवेल'चा आमदार कोण होणार? या चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्याच पक्षाचा आमदार निवडून येईल असे सांगत असला तरी देखील प्रत्यक्षात पनवेलचा आमदार कोण होणार? ते आज २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, ‘शेकाप'चे माजी आमदार बाळाराम पाटील, ‘शिवसेना'च्या लीना गरड, ‘मनसे'चे योगेश चिले, कांतीलाल कडू, पवन काळे यांच्यात लढत होत आहे. २००९ आणि २०१४च्या विधानसभा  निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी ‘शेकाप'च्या बाळाराम पाटील यांचा दोनवेळा पराभव केला आहे. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘शेकाप'च्या हरेश केणी यांचा देखील प्रशांत ठाकूर यांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली होती.

सध्या हरेश केणी ‘भाजपा'मध्ये आहेत. २०२४ च्या निवडणुकीत ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'कडून लीना गरड, ‘मनसे'कडून योगेश चिले आणि ‘लोकमुद्रा जनहित पार्टी'कडून कांतीलाल कडू आणि ‘भारतीय जनसम्राट पार्टी'कडून पवन काळे यांनी पनवेल मतदारसंघात केलेल्या प्रचारामुळे या निवडणुकीत रंगत आणली आहे. २०१४ मध्ये पनवेलमध्ये सरासरी ६७ टक्के, तर २०१९ मध्ये ५४.१३ टक्के मतदान झालेे होते. यंदा २०२४च्या निवडणुकीत पनवेल मध्ये ५८.६३ टक्के मतदान झाले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती देत नागरिकांकडून मते मागितली. तर त्यांच्या विरोधकांनी पाणी प्रश्न, रस्ते, नैना प्रश्न, मालमत्ता कर यावरुन रणकंदन माजवले. या निवडणुकीत नोटा किती टक्के मते मिळवते, ते देखील पाहणे देखील औत्सुवयाचे ठरणार आहे. मनसे देखील स्वतंत्रपणे लढली असल्याने त्यांना किती मते मिळतात? ते देखील पहावे लागणार आहे. ग्रामीण भागात ‘शेकाप'चा अद्यापही जोर कायम आहे, तर शहरी भागातील मतदार आ. प्रशांत ठाकूर यांना मानणारे आहेत. त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात देखील अनेकांनी ‘भाजपा'मध्ये प्रवेश केला आहे. ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या लीना गरड यापूर्वी ‘भाजपा'च्या नगरसेविका होत्या. त्यांनी काही महिन्यापूर्वी ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला. त्यांनी देखील ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार म्हणून या भागात जोरदार प्रचार केला आहे.

एकंदरीतच या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रचारात सर्वच पक्षांनी बाजी मारली. विधानसभा निवडणूक-२०२४ मध्ये पनवेल मतदारसंघात किमान ६०पेक्षा जास्त मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अनेकांनी मतदान केलेच नाही तर काहींची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना केंद्रावरुन परतावे लागले आहे. तरीही आता ‘पनवेल'चा आमदार कोण? या गाव-गप्पांना उधाण आले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अटीतटीच्या लढतीत मंदाताई म्हात्रे विजयी