मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सीआरपी १४९ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटीस देखील बजावल्या आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या ४ मतदार संघातील मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या ४ विधानसभा मतदारसंघाचा भाग येतो. २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या १५०-ऐरोली, १५१-बेलापूर, १८८-पनवेल आणि १९०-उरण या चार मतदार संघामध्ये हाणामारी आणि पैसे वाटपाच्या किरकोळ घटना वगळता, विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडले. आज २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

या निकालानंतर पराभूत झालेल्या आणि विजयी उमेदवाराच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद आणि भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ स्तरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात पेट्रोलिंग, तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.   

त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी पूर्वखबरदारी म्हणून काही पक्षांच्या पदाधिकारयांना सीआरपीसी १४९ प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्‌भवणार नाही असे कृत्य करु नये, अशी समज पोलिसांकडून या नोटीसद्वारे दिली गेली आहे.  

चारही मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ऐरोली, सेक्टर-५ मधील सरस्वती विद्यालयात होणार आहे. तसेच बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नेरुळ, सेक्टर-२४ मधील आगरी-कोळी भवन येथे होणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल मतदारसंघाची मतमोजणी पनवेल मधील ठाणा नाका येथील अंजुमन इस्लाम काळसेकर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तर उरण मतदारसंघाची मतमोजणी जासई येथील जिल्हा परिषद शाळेत होणार आहे. या चार मतदार संघातील मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या मतमोजणी केंद्रावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते निकाल पाहण्यासाठी येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चारही मतमोजणी केंद्रावर तसेच आजुबाजुच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या चारही मतमोजणी केंद्रालगतच्या मार्गावर निवडणूक कामकाजासाठी अधिग्रहीत केलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींग आणि प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. मात्र, सदर अधिसुचनेतून पोलीस वाहने, अग्निशमन दल, शासकीय वाहने, ॲम्बुलन्स तसेच निवडणुकीच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘पनवेल'चा आमदार होणार कोण?