‘नमुंमपा'ची अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग हटाव मोहीम
नवी मुंबई : न्यायालयाने ९ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या जनहित याचिका क्र.१५५/२०२१ बाबत दिलेल्या आदेशान्वये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज हटविण्याची विशेष मोहीम २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम ‘नमुंमपा'च्या सर्वच आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज हटविण्यात येणार आहेत.
सदर या मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज हटविण्यात येणार असून निष्कासन खर्चासाठी आलेली दंडात्मक रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अन्वये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनापरवागी अनधिकृतरित्या होर्डींग, बॅनर लावणे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहोचविणारे आहेत. सदर मोहिमेनंतरच्या कालावधीत विनापरवानगी होर्डींग, बॅनर लावण्यात येऊ नयेत, असे सूचित करण्यात येत आहे. अन्यथा सदर अधिनियमाद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, याविषयी कोणत्याही नागरिकास सूचना, तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा महापालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा श्ब् ऱ्श्श्ण् या नवी मुंबई महापालिकेच्या ॲपवर अथवा ८४२२९५५९१२ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर नागरिक आपली तक्रार, सूचना नोंदवू शकतात.
नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराचा स्वच्छ-सुंदर शहर असा नावलौकिक टिकविण्यासाठी आणि वृध्दींगत करण्यासाठी शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - डॉ. कैलास शिंदे, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.