रानमांजरांच्या पिल्लांना जीवनदान
उरण : उलवे मधील साई मंदिराजवळील दगडखाणीच्या अवघड भागात अडलेल्या रानमांजराच्या पिल्लांची निसर्गमित्रांनी वन विभागाच्या मदतीने सुखरुप सुटका केली आहे.
मुकेश विष्णू पाटील यांना उलवे साई मंदिराजवळ असलेल्या आयजीबीके बालाजी क्रशर प्लांट मध्ये एक मांजरीचे पिल्लू क्रशर प्लांटच्या तोडलेल्या दगडांमध्ये अडकलेले असून ते पिल्लू घरात पाळल्या जाणाऱ्या मांजरीच्या पिल्लापेक्षा थोडे वेगळे दिसत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुकेश पाटील यांनी याबाबतची माहिती नेचर फ्रेण्डस् सोसायटी, पनवेल या संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांना दिली. यानंतर संतोष उदरे यांनी उरण वन परिमंडळाचे आरएफओ विष्णू कोकारे यांना त्याची माहिती देताच आरएफओ कोकरे तत्काळ शार्दूल वारंगे, उरण वन परिमंडळाचे भाऊसाहेब संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.
यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता रान मांजरीची ३ पिल्ले दगडखाणीमध्ये मध्यभागी अडकलेली दिसली. पिल्ले २-३ दिवसापासून तिथे अडकली असल्याने ओरडत आहेत म्हणून त्यांचे जीव वाचवण्यासाठी दगडखाणीतील कामगारांनी २-३ दिवसांपासून तेथील दगड तोडण्याचे काम बंद ठेवले आहे.
यानंतर आरएफओ कोकारे यांच्या मार्गदर्शनानुसार बचावकार्य सुरु करण्यात येऊन दगडखाणीच्या अवघड भागातून मोठ्या शर्तीने आणि २ तासाच्या अथक प्रयत्नाने रान मांजराच्या ३ पिल्लांची यशस्वी सुटका करण्यात आली.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाऊसाहेब संजय पाटील, नेचर NFS संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे, शार्दूल वारंगे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
दरम्यान, रानमांजरीचे म्हणजेच जंगल कॅटचे शास्त्रीय नाव Felis chaus असे असून एका अभ्यासानुसार सदर रानमांजर दिवसाला ३ ते ५ उंदरांची शिकार करते, असे आढळून आले आहे. यावरुन कृतंक वर्गातील प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यामध्ये घुबड सारख्या पक्ष्यांनतर या मांजरीचा क्रमांक लागतो. पर्यावरणातील अन्नसाखळीमध्ये या मांजरीचे स्थान अव्वल असल्याचे दिसून येते.