एपीएमसी धान्य बाजारात विना परवाना बांधकाम
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात विना परवाना बांधकामे करण्यात येत असून, आणखी एक विना परवाना बांधकाम प्रकरण समोर आले आहे. एपीएमसी धान्य बाजारातील डब्ल्यू विंग मध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीच्या नावाखाली एकूण २५ हजार चौरस फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामावर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून, काम थांबविण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांवर एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
एपीएमसी धान्य बाजारातील डब्ल्यू विंगमधे २५ हजार चौरस फुट जागेवर दुरुस्तीच्या नावाखाली तोडफोड करुन विना परवाना बांधकाम सुरु करण्यात आले होते. जवळपास २५ हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या ८० गाळ्यांची तोडफोड करून एकत्रीकरण केले जात होते. एपीएमसी बांधकाम उप समिती आणि संचालक मंडळाच्या सभेत कोणतीही परवानगी न घेता ७०-८० कार्यालय ब्रेकरच्या साह्याने तोडफोड आणि एकत्रीकरण करुन बांधकाम केले जात होते. एपीएमसी धान्य बाजारातील डब्ल्यू विंग मध्ये व्यापाऱ्यांसाठी असलेली जवळपास ८० कार्यालय एका खाजगी संस्थेला देण्यात आली आहेत. सदर कार्यालय दुरुस्तीचे नावाने तोडफोड करुन एकत्र करण्याचे काम सुरु होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या बांधकामामुळे इमारतीच्या मूळ रचनेला धक्का बसला असून कधीही पडू शकते, अशी शवयता असल्यामुळे सदर बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका अतिक्रमण अधिकारी यांनी दिली. सदर बांधकाम करण्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून, एपीएमसीकडून दुरुस्तीची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, ‘एपीएमसी' प्रशासनाच्या नोटीसमध्येही नवी मुंबई महापालिकेकडून संबंधित परवानगी घेण्याबाबत नमूद करण्यात आले असूनही सबंधितांनी परवानगी घेतली नाही, अशी माहिती महापालिका तुर्भे विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी दिली.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजारातील डब्ल्यू विंग मध्ये अनधिकृत बांधकाम सुरु होते. एपीएमसी प्रशासनाला दुरुस्ती करण्यात येत असल्याचे सांगून प्रत्यक्षात जवळपास ८० गाळे एकत्रित करण्याचे काम सुरु होते. मात्र, या बांधकाम करिता नवी मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांचे काम त्वरित थांबून एमआरटीपी ॲवट नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - प्रबोधन मवाडे, तुर्भे विभाग अधिकारी, नवी मुंबई महापालिका.