एपीएमसी भाजीपाला बाजारात अनियमितपणे मालधक्क्यावर भाजीपाला विक्री?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात शेतमाल.विक्रीसाठी बाजार समिती प्रशासन तर्फे अधिकृत गाळे वाटप करण्यात आले असून, याच गाळ्यातून शेतमाल विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, एपीएमसी भाजीपाला बाजारात काही घटक अनियमितपणे मालधक्क्यावरच भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारातील परवानाधारक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने सुरू असलेल्या अनियमित भाजी विक्रीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेतमालावरील नियमन मुक्ती उठविल्याने अनियमितपणे कृषीमालाचा थेट व्यापार वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार समितीवर त्याचा परिणाम होत आहे. एपीएमसी भाजीपाला बाजारात रात्री ११ ते १२ दरम्यान शेतमालांनी भरलेल्या गाड्या येण्यास सुरुवात होते.

त्यानंतर रात्री २ वाजता भाजीपाला विक्री व्यवसाय सुरु होतो. मात्र, याच दरम्यान परवानाधारक स्वतःच्या गाळ्यात  भाजीपाला विक्री व्यवसाय करत असताना बिगर परवानाधारकांकडून मालधक्क्यांवर गाड्यांमधून परस्पर अनियमितपणे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे, अशा तक्रारी एपीएमसी भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. तर काही परवाना धारक स्वतःचा गाळा भाड्याने देवून मालधक्क्यांच्या जागेत भाजीपाला विक्री करतात, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दरम्यान, बिगर परवानाधारकांकडून मालधक्क्यांवर गाड्यांमधून परस्पर अनियमितपणे भाजी विक्री व्यवसाय सुरु असल्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, या अनधिकृतपणे सुरु असलेल्या भाजी विक्री व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एपीएमसी भाजीपाला बाजारात अनियमितपणे भाजीपाला विक्री होत नाही. भाजीपाला नाशिवंत शेतमाल असल्याने नुकसान होऊ नये म्हणून गाडी खाली करतानाच ग्राहक असल्याने विक्री करुन पुढच्या लोकल गाडीत भाजीपाला भरला जातो.- मारोती पोबीतवार, उपसचिव -भाजीपाला बाजार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी धान्य बाजारात विना परवाना बांधकाम