‘उरण लोकल'ची कनेक्टिव्हिटी वाढविणार - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

उरण : उरण रेल्वे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि बोरीवली पर्यंत जोडली जाईल. मुंबईसह उरण रेल्वेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात अधिक वेगाने वाढेल यासाठी येथील लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

उरण विधानसभा मतदारसंघातील ‘महायुती'चे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारासाठी रेल्वेमंत्री वैष्णव १७ नोव्हेंबर रोजी उरण शहरात आले होते, त्यावेळी त्यांनी सदरची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये रेल्वे मोठी गुंतवणूक करीत आहे. महाराष्ट्रात १लाख ६४ हजार कोटी रुपये खर्चुन ‘रेल्वे'ची गुंतवणूक होत आहे. मुंबईमध्ये १६,२४० कोटींची गुंतवणूक होत आहे. यामुळे ‘रेल्वे'ची क्षमता अधिक पटीने वाढणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.

उरणसाठी रेल्वेसेवा सुरु झाली आहे. आता येथून मुंबई, ठाणे, बोरीवली आणि इतर ठिकाणी थेट रेल्वेगाडी सुरु व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आमदार बालदी यांनी सांगितले. याप्रसंगी ‘आरपीआय'चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, मेघनाथ तांडेल, शिवसना तालुका प्रमुख महेंद्र पाटील, संजय गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, कामगार नेते सुरेश पाटील, भूपेंद्र घरत, राजेश ठाकूर, सुनील पेडणेकर, राजेंद्र खारपाटील, आदिंसह ‘भाजपा'चे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी भाजीपाला बाजारात अनियमितपणे मालधक्क्यावर भाजीपाला विक्री?