नेरुळ मधील मतदान केंद्रात आगरी कोळ्यांच्या संस्कृतीचे दर्शन
नवी मुंबई : 151-बेलापूर मतदार संघातील नेरुळ सेक्टर-12 मधील तेरणा मेडिकल कॉलेजमधील मतदान केंद्रामध्ये आगरी कोळी लोकांचा पारंपरिक व्यवसाय दर्शविणारा देखावा साकारण्यात आल्याने हे मतदान केंद्र सर्वांचेच आकर्षण ठरले. विशेष म्हणजे या मतदान केंद्रामध्ये स्थानिक आगरी कोळ्यांची वेशभूषा केलेल्या शाळकरी मुलांकडुन मतदारांचे स्वागत करण्यात येत असल्याने मतदारांकडुन त्यांचे कौतुक करण्यात येत होते.
विधानसभा निवडणुकीकरीता बुधवारी संपुर्ण राज्यात उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणुक आयोगांकडुन वेगवेगळ्या उपायोजना करण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणुन निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी सुर्वे पाटील तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास गरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल अधिकारी प्रशांत चेहरे यांनी 151-बेलापूर मतदार संघातील नेरुळ सेक्टर-12 मधील तेरणा कॉलेजमधील मतदान केंद्रामध्ये विशेष सांस्कृतिक झोन तयार करण्यात आला होता. या सांस्कृतिक झोनमधील मतदान केंद्रामध्ये आगरी कोळी लोकांचा पारंपरिक व्यवसाय दर्शविणारा देखावा साकारण्यात आला होता.
तसेच या मतदान केंद्रामध्ये स्थानिक आगरी कोळींची वेशभूषा केलेल्या शाळकरी मुलांकडुन मतदान करण्यासाठी येणा-या मतदारांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत होते. तसेच प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे हे मतदान केंद्र सर्वांचेच आकर्षण ठरले होते. मतदान केल्यानंतर बहुतेक मतदार हे या येथील सांस्कृतीक झोनमध्ये येऊन आगरी कोळ्यांची वेशभुषा केलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या मोबाईलवरुन फोटो काढण्यास पसंती देत होते. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते.