८ फुटी अजगराला जीवनदान
कल्याण : १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास रुपेश म्हात्रे यांना डोंबिवली पूर्व मधील गोलवली व्हिलेज येथे त्यांच्या घराशेजारी अजगर जातीचा साप निदर्शनास आला. यानंतर रुपेश म्हात्रे यांनी तातडीने त्याची माहिती सर्पमित्र बाबाजी पाडेकर यांना दिली.
यानंतर सर्पमित्र बाबाजी पाडेकर यांनी घटनास्थळी पोहोचून सदर अजगरला सुरक्षितरित्या पकडले. तसेच तेथील लोकांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज दूर केले. यानंतर त्यांनी अजगराची माहिती वन परिक्षेत्र प्रा. कल्याणचे वनाधिकारी राजू शिंदे यांना कळवली.
शहरीकरणामुळे सापांचा आधीवास नष्ट होत आहे. जंगले, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, नद्या इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीव अधिवासांवर मानवी अतिक्रमण होत आहे. यामुळे भक्ष्याच्या शोधत वन्यजीव मानवी वस्तीत वावरताना आणि त्यांचा अधिवास सहजतेने दिसत आहे. अजगराची योग्य ती तपासणी केल्यानंतर त्याचे वजन अंदाजे ९ किलो असून लांबी ८ फुट अशी नोंद करण्यात आली. दरम्यान, वन विभागाच्या परवानगीने सदर अजगराला सर्पमित्र बाबाजी पाडेकर, पुर्वेश कोरी, सुभाष पांडियन, भूषण रानडे आणि राजू केन यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.