निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ‘टीएमटी'ची बसव्यवस्था
ठाणे : आज २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नियुवत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) बस व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी १७३ बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी जाता यावे यासाठी ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम-सॅटीस येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. सॅटीस ते होरायझन शाळा, सॅटीस ते वागळे इस्टेट-आयटीआय आणि सॅटीस ते बेथनी हॉस्पिटल या मार्गावर सदर सेवा देण्यात आली.
तर आज २० नोव्हेंबर रोजी रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण करुन ठाणे स्टेशनवर पोहोचण्यासाठीही बस सेवा देण्यात येणार आहे. सदर सेवा रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहील. होरायझन शाळा, वागळे इस्टेट-आयटीआय आणि बेथनी हॉस्पिटल येथून ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम या मार्गावर बससेवा उपलब्ध असेल, असे ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितले.
ठाणेकरांनी मतदानाचा हक्क बजावावा!
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान करुन लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
सर्वंकष स्वच्छता मोहीम...
मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार १६ ते १८ नोव्हेंबर या काळात मतदान केंद्र आणि परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मतदान केंद्र, त्याचा सभोवतीचा १०० मीटरचा परिसर स्वच्छ करण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्थानिक प्रभाग समिती आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समन्वयाने एकूण ३६७ ठिकाणी असलेल्या १५२८ मतदान केंद्रांवर सदर मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी १३९० कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनिष जोशी यांनी दिली.