महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबध्द -जे. पी. नड्डा

नवी मुंबई : महाराष्ट्रात ‘भाजपा'च्या नेतृत्वाखालील महायुती उगवता सूर्य असून आमचे सरकार महाराष्ट्राला प्रकाश देईल, तर महाविकास आघाडी महाराष्ट्राला अंधारात ढकलणार आहे. महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी कटीबध्द आहे, तर महाविकास आघाडी तुमच्या अडचणीत आणखी वाढ करेल. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना नड्डा म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी त्यांचा पक्ष विसर्जित करु; पण ‘काँग्रेस'शी तडजोड करणार नाही. पण, आज उध्दव ठाकरे सत्तेसाठी ‘काँग्रेस'च्या मांडीवर बसल्याचा आरोप नड्डा यांनी ‘भाजपा'चे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेरुळ येथे केला.

‘भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी महायुती'च्या १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थ १८ नोव्हेंबर रोजी नेरुळ, सेवटर-१२ मधील रामलिला मैदान येथे आयोजित प्रचार सभा मध्ये जे. पी. नड्डा बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रभारी आ. प्रसाद लाड, ‘महायुती'च्या उमेदवार आ. सौ. मंदाताई म्हात्रे, ‘शिवसेना-शिंदे गट'चे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर, ‘राष्ट्रवादी अजित पवार गट'चे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आदिंसह ‘महायुती'मधील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील एनडीए आणि भाजपच्या नेतृत्वाखालील ‘महायुती सरकार'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन संस्कृती आणि राजकारणाची नवीन व्याख्या तयार केली आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी सरकार देत आहोत, असे नड्डा यांनी सांगितले.
 ‘संविधान'वर लोकांची दिशाभूल केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना नड्डा म्हणाले, आज राहुल गांधी संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत आहेत. त्यांनी संविधानाचे पुस्तक वाचलेले नाही, ते नुसते घेऊन फिरत आहेत.

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिले होते. मात्र, आज काँग्रेस पक्ष कर्नाटक मध्ये खासगी कंत्राटदारांना टेंडर देताना अल्पसंख्यांकांना ४ टक्के आरक्षण देत आहे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

 आर्थिक धोरणाच्या आघाडीवर जगाला पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये आशेचा किरण दिसत आहे. १० वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था १२ व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान मोदी यांनी भारत पाचवी सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात तुम्ही महाराष्ट्रात ‘महायुती'चे सरकार स्थापन करा आणि भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे नड्डा म्हणाले. तसेच आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांना मोठ्या मताधिववयाने निवडून आणा, असे आवाहन नड्डा यांनी मतदारांना केले.

लाडका भाऊ मैदानात उतरला आहे. आ. मंदाताई म्हात्रे हॅटट्रिक करणार आहेत. २३ नोव्हेंबर रोजी ‘महायुती'चे सरकार येणार. ‘भाजपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा पंतप्रधानांचा संदेश घेवून आले आहेत. प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र पालथा घातला, तेव्हा पण एक वातावरण पाहिले. सर्व योजनांच्या लाभार्थीने ठरवले आहे की, ‘महायुती'ला मतदान करणार. घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. कोमट पाणी पिऊन फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. टोमणे मारुन अडीच वर्षे घालवली. प्रकल्पांचा फायदा लोकांना होत आहे. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांमध्ये शोभून दिसतो. शासन आपल्या दारी योजनेंतर्गत ५ कोटी लोकांना फायदा झाला. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये स्पर्धा लावली. आम्ही केलेली अडीच वर्षातली कामे आणि ‘महाविकास आघाडी'चे काम तोलून बघा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे सोबत नडायला मनगटात ताकद लागते. संघर्ष करुन पुढे आलो आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या लोकांसाठी मी जेलमध्ये जाईन. दुसरीकडे नवी मुंबईतील शिवसैनिकांनी विजय नाहटा यांना टाटा करायचे आहे. ज्यांना ताकद दिली त्यांनी बेईमानी केली. ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा हिशोब मी करणार आहे. एका रात्रीत काय करु शकतो, ते महाराष्ट्रातील लोकांनी पाहिले असल्याचा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना लगावला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

यंत्रणा सज्ज; आता मतदार राजाची जबाबदारी