डंपिंग ग्राऊंडवरुन रणकंदन
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांसाठी डम्पिंग ग्राऊंडची समस्या डोकेदुखी ठरली आहे. उमेदवारांना डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा उपस्थित करुन नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
महायुती आणि ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवारांनी देखील आपल्या ‘वचननामा'मध्ये डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. अंबरनाथ मधील डम्पिंग ग्राऊंड जवळ राहणाऱ्या नागरिकांनी तर डम्पिंग ग्राऊंंडच्या समस्येमुळे मतदान करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार राजेश वानखेडे त्यांच्या रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले. नागरिकांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरासाठी २ वेगवेगळे डम्पिंग ग्राऊंड आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील नागरिक त्रस्त आहे. उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका तसेच राज्य सरकार यांनी डम्पिंग ग्राऊंंडची समस्या सोडविण्यासाठी अनेक योजना घोषित केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. ‘महायुती'मधील शिवसेना उमेदवार डॉ. बालाजी किणीकर आणि ‘महाविकास आघाडी'तील (उबाठा)चे उमेदवार राजेश वानखेडे यांनी आपल्या ‘वचननामा'मध्ये डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बालाजी किणीकर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत, याचा रोष नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे.
१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला अंबरनाथ पश्चिम मधील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सदरचा प्रतिसाद बघून डॉ. बालाजी किणीकर आणि त्यांचे समर्थक चक्रावून गेले. दरम्यान, लवाजम्यासह राजेश वानखेडे डम्पिंग ग्राऊंड जवळ असलेल्या सूर्योदय नगर आणि आसपासच्या परिसरात भेटण्यास गेले असता नागरिकांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. आजवर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला कोणताही उमेदवार भेटण्यास आला नाही. मात्र, आपण स्वतःहून आम्हाला भेटण्यास आलात आमच्या समस्या जाणून घेतल्या. आमची समस्या आपण सोडवाल, अशी आम्ही अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना राजेश वानखेडे म्हणाले की, या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. माझ्या ‘वचननामा'मध्ये डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडवणे या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. केवळ डम्पिंग ग्राऊंडच नव्हे तर या मतदारसंघात अनेक नागरी समस्या आहेत, त्या सोडविण्यात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना अपयश आले आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे.
अंबरनाथ शहरातील डम्पिंग ग्राऊंड प्रमाणेच उल्हासनगर शहराला डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येने ग्रासले आहे. उल्हासनगर-५ येथील डम्पिंग ग्राऊंड मुळे दुर्गंधी आणि प्रदुषणामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मी स्वतः अनेकदा या संदर्भात आंदोलन केले आहे. मात्र, उल्हासनगर महापालिका आणि राज्य सरकार सदरची समस्या सोडवू शकले नाही. ‘महाविकास आघाडी'चे सरकार आल्यास डम्पिंग ग्राऊंडची समस्या प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन ‘महाविकास आघाडी'चे समन्वयक तथा काँग्रेस नेते रोहित साळवे यांनी यावेळी दिले.
दरम्यान, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तिन्ही शहरांसाठी एकत्रितरित्या राज्य सरकारद्वारे घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार असून लवकरच डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. किणीकर यांनी दिली.