सत्तेच्या हव्यासापायी बंडखोरीत वाढ  

नवी मुंबई : यावेळची विधानसभा निवडणूक बंडखोरांचीच निवडणूक आहे. निवडणुकीत वाढत्या बंडखोरीमुळे नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. तर प्रत्येकालाच सत्तेची हाव सुटल्याने बंडखोरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. प्रत्येक जण आपआपल्या गरजेनुसार बंडखोरीवर उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांनी सजग राहून आपले बहुमुल्य मत योग्य उमेदवाराच्या पारड्यात टाकून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन ‘नवी मुंबई प्रेस क्लब'तर्फे आयोजित चर्चासत्रात सहभागी पत्रकारांनी केले.  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘नवी मुंबई प्रेस क्लब'ने नवी मुंबईतील पत्रकारंच्या नजरेतून बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी १५ वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘आघाडी, युती अन्‌ बंडखोर किती' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करुन लोकशाहीचा जागर घातला होता.

या चर्चासत्रामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असलेले नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, प्रवीण पुरो, जयेश सामंत, विनय म्हात्रे, संजय सुर्वे, जगदीश तांडेल, स्वाती नाईक आदि सहभागी झाले होते. या पत्रकारांशी ‘नवी मुंबई प्रेस क्लब'चे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी संवाद साधला.  

निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या बंडखोरीची आता लोकांना सवय झाली आहे. या प्रकाराची जनतेमध्ये चीड आहे. त्यामुळे जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही. नवी मुंबईत झालेली बंडखोरी निव्वळ पुनर्विकास प्रकल्पांचा मलिदा लाटण्यासाठी होत असलेल्या लॉबींगचा भाग असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी याप्रसंगी मांडले.  

तर बंडखोरी करणे अशी महत्त्वाकांक्षी राजकारण्यांची गरज झाली असून गरजेपोटीच्या बंडखोरीमुळे राजकारणाचा विचका झाला असून नवी मुंबईतील चारही विधानसभा मतदारसंघामध्ये उभे असलेल्या उमेदवारांनी यापूर्वी कधी ना कधी बंडखोरी करुनच निवडणुका लढविल्या आहेत. नवी मुंबईत घराणेशाही आणि प्रस्थापितांचे वर्चस्व असल्याने इतरांना वेगवेगळ्या कारणास्तव बंडखोरी करावी लागली असल्याचे पत्रकार जयेश सामंत यांनी नमूद केले.  

पत्रकार प्रवीण पुरो यांनी राजकारण फार खालच्या पातळीवर गेल्याचे नमूद करत देशामध्ये सर्वात विकृत राजकारण महाराष्ट्रात सुरु असून राज्याचे मंत्रालय सर्वसामान्यांसाठी राहिल नसल्याचे ते म्हणाले  

तर प्रस्थापित नेत्यांची मुले मोठी झाल्याने त्यांच्याही महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढविण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने एका घरात एकच तिकिट देण्याचे धोरण अवलंबले असेल तर त्या घरातील दुसऱ्या इच्छुकाला बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मतदारांनी ठरवायचे आहे की बंडखोरांना निवडून द्यायचे की पक्षाच्या उमेदवाराला, असे पत्रकार संजय सुर्वे यावेळी म्हणाले.  

वाढत्या बंडखोरीमुळे येणारा काळ ‘निवडणूक आयोग'साठी किंवा देशासाठी कठीण काळ ठरणार आहे. उच्चशिक्षित तरुण- तरुणींनी राजकारणात यायला पाहिजे. कारण अजुनही राज्याच्या राजकारणात तेच तेच चेहरे दिसत आहेत. त्यामुळे लोकांना आता बदल अपेक्षित असून ते बदल करण्याच्या तयारीत असल्याचे पत्रकार विनय म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

सध्या काही राजकीय पक्ष प्रायव्हेट प्रॉपर्टी झाल्याचे दिसून येते. आज कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलाय का? पक्ष कार्यकर्त्यांचा असतो, कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते, ते अजूनपर्यंत मतदारांना उमगलेले नाही. जेव्हा उमगेल तेव्हा अशा प्रकारच्या या बंडखोरी बंद होतील. आता या बंडखोरांना जर धडा शिकवायचा असेल तर तो सुज्ञ मतदारच शिकवू शकतील, असा विश्वास पत्रकार जगदीश तांडेल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.  

राज्यात कोणतेही सरकार आले तरी लाडकी बहीण वगैरे योजना नंतर बंद पडणारच आहेत. विद्यमान सरकारला या योजनेचा थोडाफार फायदा होईल. परंतु, सुशिक्षित महिला मतदार या नक्कीच योग्य उमेदवाराला निवडून देतील. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकी दरम्यान विविध योजनांची पेरणी राज्यकर्त्यांकडून जाणूनबुजून केली जात असल्याचे पत्रकार स्वाती नाईक यांनी यावेळी नमूद केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डंपिंग ग्राऊंडवरुन रणकंदन