ऐरोली, बेलापूर मतदार संघात ७३ हजार दुबार मतदार
नवी मुंबई : ‘निवडणूक आयोग'ने अद्ययावत केलेल्या मतदार यादीमध्ये अद्यापही घोळ कायम असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदार संघात सुमारे ७३ हजार मतदारांची नावे नवी मुंबईत आणि त्यांचे मुळ गांव असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचा आरोप ‘शिवसेना'चे बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केला आहे. सदर दुबार मतदार विशेष करुन पुणे आणि सातारा जिह्यातील विविध मतदारसंघातील असल्याचे पाटकर म्हणाले.
नवी मुंबईतील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक यंत्रणेला हाताशी धरुन सदर नावे मतदार यादीत नोंदवली असल्याचा गंभीर आरोप पाटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. मतदार यादीतील सदर दुबार नावांची सखोल चौकशी करुन होणारा गैरप्रकार थांबवण्याची मागणी या संदर्भातील तक्रारीत करण्यात आली आहे.
निवडणुकीत बोगस मतदान करण्याचे प्रकार घडत असतात. मात्र, राजकारणातील काही महाभाग यंत्रणेतील एखाद्या व्यक्तीला हाताशी धरुन मतदार संघाबाहेरील आपल्या मर्जीतील व्यक्तींची नावे आपल्या मतदार संघात समाविष्ट करुन घेतात. अशा गैरकृत्याद्वारे वर्षानुवर्षे निवडणूक जिंकत असतात. अशाच प्रकारे नवी मुंबईतील एका राजकीय नेत्याने ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५४६ आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३१,६८६ मतदारांची नावे नोंदविल्याचा आरोप किशोर पाटकर यांनी केला आहे. सदर मतदारांची नावे त्यांच्या मूळ गावाच्या मतदार यादीत देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी राजकीय मंडळी विशेष वाहनांची व्यवस्था करुन त्यांना रातोरात गावाकडे पाठवतात आणि तेथे मतदान झाल्यानंतर पुन्हा तातडीने मतदान करण्यासाठी नवी मुंबईत घेऊन येतात. अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासून राजकीय मंडळी निवडणुका जिंकत आहेत. परिणामी, प्रामाणिकपणे जीवाचे रान करुन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे किशोर पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ७३,२३२ हजार दुबार मतदार नोंद असलेल्या मतदारांना नवी मुंबईतील मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी संबंधित राजकीय परिवाराने अनेक कार्यकर्त्यांच्या फौजा कामाला लावल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती ‘निवडणूक आयोग'ला ई-मेलद्वारे आणि लेखी पत्राद्वारे दिली असल्याचे किशोर पाटकर यांनी सांगितले.
त्यानुसार लोकशाही मजबूत करण्यासाठी अशा दुबार नावे असलेल्या मतदारांवर ‘निवडणूक आयोग'ने नजर ठेवावी. त्यांनी ज्या ठिकाणी मतदान केले आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करुन ठेवावे. म्हणजे त्यांच्या नावावर इतर कोणी मतदान करु शकणार नाही. दुबार मतदारांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची मागणी पाटकर यांनी केली आहे.
मतदार यादीत नावे असलेल्या पुणे, सातारा जिह्यातील विविध मतदारसंघांची नावे, दुबार मतदार संख्याः
ऐरोली दुबार मतदार बेलापूर दुबार मतदार
२६१ पाटण ६११४ २६१ पाटण ४४२३
२५६ वाई ४५४३ ५६ वाई ३३७२
२५७ कोरेगाव ३८९६ २५७ कोरेगाव ३२४४
२६० कराड दक्षिण ४५९५ २६० कराड दक्षिण ३६२९
२६२ सातारा ५००२ २६२ सातारा ३५३०
१९५ जुन्नर १७९५ १९५ जुन्नर १६८८
१९६ आंबेगाव १४९० १९६ आंबेगाव १३७४
२०३ भोर ३२०३ २०३ भोर १८७८
१५१ बेलापूर ३६८२ १५१ बेलापूर ३६८२
१५० ऐरोली ७२२६ १५० ऐरोली ४८६६
एकूण ४१५४६ एकूण ३१६८६