आंतरराज्य टोळीतील चौकडीवर मोक्कांतर्गत कारवाई  

नवी मुंबई : दिल्लीमध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग या सारखे गंभीर गुन्हे करुन फरार असलेल्या आणि नवी मुंबईत चेन स्नॅचींग आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे करुन धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

ऑवटोबर महिन्यामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या टोळीतील चौघांना अटक केली होती. या टोळीने दिल्लीसह नवी मुंबईत संघटतरित्या गुन्हे केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये सागर जुगेश मेहरा (२७), अभय सुनिलकुमार नैन (१९), शिखा सागर मेहरा (२७) आणि अनुज विरसींग छारी (२४) या चौघांचा समावेश आहे. या टोळीने सप्टेंबर महिन्यात एका आठवड्यामध्ये सीबीडी, खारघर, पनवेल, कळंबोली, नेरुळ, वाशी, सानपाडा आणि कामोठे परिसरात चेन स्नॅचींगचे गुन्हे करुन धुमाकुळ घातला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने घटनास्थळी भेटी देवून तसेच तांत्रिक तपास करुन या टोळीतील आरोपींचे छायाचित्र प्राप्त केले होते.  

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने उलवे परिसरातील ४० ते ४५ सोसायट्या आणि गेस्ट हाऊसची तपासणी करुन या चारही आरोपींना जेरबंद केले होते. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई परिसरात ७ जबरी चोरी, २ वाहन चोरी तसेच दिल्लीमध्ये १ गुन्हा असे एवूÀण १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीकडून १ सोन्याचे मंगळसूत्र, ३ सोन्याच्या चेन, २ तुटलेल्या सोन्याच्या चेनचे तुकडे असे एवूÀण ६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच २ केटीएम मोटारसायकल असा एकूण ७.७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

या टोळीतील आरोपी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच प्राप्त पुरावे याचे अवलोकन करुन गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी या आरोपींविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाईस मंजुरी दिली आहे. त्यानुसार या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली सदर आंतरराज्यीय सराईत टोळी दिल्ली येथून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे करुन फरार झाले होते. यातील सागर जुगेश मेहरा या आरोपी विरुध्द दिल्ली येथे ३७ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात तो फरार आहे. सदर आरोपी दिल्ली येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात ४ जाहिरनामे सुध्दा प्रसिध्द केले होते. तसेच अनुज विरसींग छारी याच्या विरोधात देखील कोपरखैरणे आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गॅस टँकरमधून बेकायदा गॅस सिलेंडर रिफिलिंग; उरण पोलिसांची छापेमारी