बदलापूरच्या अग्निशमन दलाचा ढिसाळ कारभार
बदलापूर : बदलापूर एमआयडीसी मध्ये हाकेच्या अंतरावर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल अर्धा तास उशिरा पोहोचले. त्यातही अग्निशमन वाहनात पुरेसे पाणी नसल्याने आग विझवण्यास विलंब झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी ‘बदलापूर'चे अग्निशमन दल हतबल ठरतय का? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘कुळगांव-बदलापूर नगर परिषद'च्या अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५च्या सुमारास बदलापूर एमआयडीसी मधील एका गोडावूनला आग लागली. या आगीत गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेले प्लास्टिकचे रिकामे पिंप आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आग वाढल्यानंतर उग्र वास तसेच धुराचे लोट पसरु लागल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बदलापूर एमआयडीसीतील मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आग लागलेली असल्याने तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ लागला. त्यातही आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन वाहनात पुरेसे पाणी नसल्याने काही मिनिटातच त्यातील पाणी संपले. त्यामुळे पाण्याचा टँकर मागविण्याची वेळ आली. पाण्याचा टँकर येण्यासही सुमारे २० मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळे आगीची तीव्रता वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बदलापूर एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या असून त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय एमआयडीसी लगतच रहिवासी क्षेत्रही असून आतापर्यंत कंपन्यांमध्ये आगीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आगीची घटना घडल्यास अग्निशमन दल सज्ज असणे अपेक्षित आहे. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासही अग्निशमन दलाला अर्धा तास लागत असेल तर बदलापूरकरांच्या अग्निसुरक्षेचे काय? असा संतप्त सवाल बदलापूरकर उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, यासंदर्भात अग्निशमन अधिकारी वांगल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. सदर गोडावूनला आग कशामुळे लागली? याचे निश्चित कारण समजू शकले नाही.
अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची कमतरता...
‘कुळगांव-बदलापूर ‘नगरपरिषद'च्या अग्निशमन दलात १ अग्निशमन अधिकारी, १ लिडिंग फायरमन, ४ फायरमन, ३ चालक आणि ११ सफाई कामगार सहाय्यक म्हणून काम करीत असून येथे तब्बल ३३ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अग्निशमन दलाकडून गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. २ वर्षांपूर्वी ‘नगरपरिषद'चे तत्कालीन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी यावर मार्ग काढण्यासाठी ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या धर्तीवर हंगामी पध्दतीने मानधन तत्त्वावर कर्मचारी नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप सदरचा प्रश्न जैसे थे आहे.