नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चेच नाव

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच आमच्या पनवेल आणि उरण या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे चांगले काम आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘महायुती'चे सरकार येईल. तसेच या ठिकाणी दोन्ही आमदार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी करंजाडे येथे व्यक्त केला.

उरण विधानसभा मतदारसंघातील ‘भाजप महायुती'चे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचार सभेत ना. मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, उमेदवार आमदार महेश बालदी, दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कर्णा शेलार, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, समीर केणी, सुभाष म्हात्रे, रेखाताई म्हात्रे, युवा नेते रुपेश धुमाळ, राकेश गायकवाड, प्रकाश पाटील, ‘शिवसेना'चे महाराष्ट्र सचिव रुपेश पाटील, संदेश पाटील, ‘राष्ट्रवादी'चे जयसिंग पाटील, ‘आरपीआय'चे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, आदि उपस्थित होते.

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यातील पुणे आणि नवी मुंबई या दोन विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे. पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, असेही केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. बा. पाटील यांच्या बद्दल गौरवोद्‌गार उदगार काढले. त्यामुळे तुमच्या मनातील शंका आता काढून टाका, १ लाख टक्के ‘दिबां'चेच नाव दिले जाईल आणि दिलेले वचन मी पूर्ण करणार आहे.  विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी त्यांच्या नोकरीचा विषय असेल किंवा मोबदल्याचा विषय असेल ते मला हक्काने सांगा मी पूर्ण करून देईन, मागे हटणार नाही, असे ना. मोहोळ यांनी आवर्जुन सांगितले. या ठिकाणी दोन रनवे आहेत. पण, तिसऱ्या आणि चौथ्या रनवेच्या शक्यतेच्या रिपोर्टवर आता काम सुरु आहे. त्यामुळे विस्थापित होणाऱ्या पाच गावांचे पुनर्वसन आणि त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही ना. मोहोळ यांनी स्पष्ट केले.

या विधानसभा निवडणुकीचा नुकताच एक सर्वे आला आहे. त्याप्रमाणे ‘महायुती'च्या १८५ ते १९० च्या आसपास जागा निवडून येऊन पुन्हा ‘महायुती'चे सरकार येईल. त्यामध्ये ‘उरण'ला महेश बालदी तर ‘पनवेल'ला प्रशांत ठाकूर निवडून येण्याचे स्पष्ट आहे. राज्यात आपल्या महायुती सरकारने अडीच वर्षात ५२ टक्के विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आणली, ते आपले यश आहे. अनेक विकासाची कामे अडीच वर्षात करण्यात आली. सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करन लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न सोडवले. असंख्य जन कल्याणाच्या योजना सुरु केल्या आहेत. साडेपाच हजार कोटीची कामे या विधानसभा मतदारसंघात केली आहेत. पनवेल-उरण मार्गावर नवीन पुल उभारण्याची मागणी महेश बालदी पूर्ण करतील, असे ना. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना उलवे येथील गर्दी पाहिल्यावर मी भविष्य वर्तवले होते की महेश बालदी पुन्हा आमदार होणार. आज येथे आल्यावर गर्दी पाहून वाटते मागच्या पेक्षा यावेळी जास्त आघाडी घेऊन बालदी निवडून येतील, असे चित्र दिसायला लागले आहे. महेश बालदी उरणच्या नगरपालिका शाळेत आणि इथल्याच कॉलेज मध्ये शिकले आहेत. त्यामुळे आपला देश एक असताना जे लोक ते इकडचा-तिकडचा करतात, त्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. महेश बालदी तर पिढ्यान्‌पिढ्या इथे राहिलेले आहेत. भविष्यात प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची कामे करण्यासाठी हक्काची माणसे लागतात, यासाठी महेश बालदी यांना निवडून देणे गरजेचे आहे, असेही रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले. तसेच विमानतळाच्या अनुषंगाने विस्थापित होणाऱ्या ५ गावांना देखील तोच न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.  

यावेळी आ. महेश बालदी, सरपंच मंगेश शेलार, रुपेश पाटील, रेखा म्हात्रे आणि अतुल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बदलापूरच्या अग्निशमन दलाचा ढिसाळ कारभार