कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त
तुर्भे : विधानसभा निवडणुकीच्या कामांमध्ये नवी मुंबई महापालिकेचे शेकडो कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याचाच गैरफायदा घेत शहरात फेरीवाल्यांना रान मोकळे मिळाले आहे. या वाढलेल्या फेरीवाल्यांमुळे शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
आचारसंहिता लागल्यानंतर काही प्रमाणात कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर गेले होते. त्यानंतर आता मागील आठवडाभरापासून निवडणुकीच्या कामाकरिता जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, शहरातील दैनंदिन सेवा काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते आणि पदपथ देखील फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. सीबीडी, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, घणसोली, दिघा या विभागातील मुख्य रस्ते आणि काही अंतर्गत रस्त्यांवर फेरीवाल्यानी त्यांचे बस्तान मांडले आहे.
विशेष म्हणजे नवी मुंबई मध्ये स्थानिक नागरिक फेरीवाले यांचा यात अल्प समावेश आहे. मात्र, नवी मुंबई बाहेरील गोवंडी, मानखुर्द आदि परिसरातील परप्रांतीय फेरीवालांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणा आहे. या फेरीवाल्यांनी रेल्वे आणि बस स्थानके तसेच अन्य वर्दळीच्या जागांवर व्यवसाय थाटले आहेत. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच पदपथ नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध नसल्याने त्यांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. अशी स्थिती नेरुळ, सानपाडा, वाशी, तुर्भे, सीबीडी, जुईनगर, कोपरखैरणे या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील सर्व पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.
अतिक्रमण विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. मात्र, महापालिकेच्या आठ विभाग कार्यालयांमध्ये फेरीवाले आणि अतिक्रमण हटवण्यासाठी नेमले ‘सुरक्षा रक्षक मंडळ'चे सुरक्षा रक्षक आणि कंत्राटदारांचे कामगार यांना निवडणुकीचे काम नाही.
रस्ते आणि पदपथ यांवर फेरीवाले बसू न देण्याची जबाबदारी या कर्मचारी-कामगारांची आहे. मात्र, यांनीच फेरीवाल्यांसोबत हातमिळवणी करून निवडणुकीपर्यंत कोणी काही करणार नाही, असे आश्वासन देत त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या हातमिळवणीमध्ये प्रत्येक विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचा एक कर्मचारी देखील सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा सर्व संबंधितांवर अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.