कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत देऊन कर्तव्य बजावावे
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांना मतदानासाठी २ तासाची सवलत अथवा पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाचे सर्व आस्थापनांनी काटेकोर पालन करावे. तसेच मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापना, दुकाने, संघटनांची बैठक १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतली. यावेळी ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध उद्योग संघटना, आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केलेल्या आवाहनास उपस्थित सर्व आस्थापना, संस्था, उद्योग प्रमुखांनी स्वागत करुन या उपक्रमात सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मतदान करणे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्यापासून एकही मतदार वंचित राहता कामा नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसून आली आहे, ते आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा यंत्रणा विविध माध्यमातून उपक्रमाद्वारे जनजागृती करीत आहे. जिल्ह्यात उद्योग, व्यवसायात तसेच संघटित आणि असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करीत आहे. या कामगारांना मतदान करण्यासाठी पूर्ण दिवसाची भर पगारी सुट्टी द्यावी. तसेच जवळच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना मतदानासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढ्या वेळेची सवलत द्यावी. तसेच त्या कामगारांनी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे की नाही, याची खातरजमा संबंधित आस्थापनांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.
मतदानासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वंचित ठेवून कामावर बोलविणाऱ्या आस्थापना, दुकाने, उद्योगसंस्था यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा यंत्रणा काम करीत आहे. मतदानाची प्रक्रिया सुखद व्हावी, यासाठी प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरिकांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्राचा क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या दोन्हीची माहिती आपल्या कामगार, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी सूचित केले.
दरम्यान, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी राज्य शासनाच्या कामगार, उद्योग, ऊर्जा विभागाने मतदानासाठी सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाची सर्वांनी माहिती देऊन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.