नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात मतदान जनजागृती
नवी मुंबई : २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४'मध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकांशी थेट संवाद साधला जात आहे.
या अनुषंगाने नवी मुंबईतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन्ही मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यासह ‘एमआयडीसी'च्या महापे येथील प्रादेशिक कार्यालयास भेट देत ‘एमआयडीसी'चे प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्योग समुहांच्या बैठकीप्रसंगी मतदान करणेविषयी उपस्थितांशी संवाद साधला.
यामध्ये महेंद्र पटेल यांनी विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून यादिवशी उद्योगसमुहांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी. ज्या कर्मचाऱ्यांंना सुट्टी देणे शक्य नसेल त्यांना मतदान करण्यासाठी वेळेची सवलत द्यावी, असे सूचित केले.
त्याचप्रमाणे उद्योगसमुहात काम करणारे सर्वच्या सर्व १०० टक्के कर्मचारी आणि कामगार मतदानाचा हक्क बजावतील अशाप्रकारे उद्योजकांनी आणि कंपनी व्यवस्थापनाने त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन करतानाच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी जे उद्योग, कारखाने आपल्या १०० टक्के अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान करुन घेतील त्यांचा महापालिका मार्फत विशेष सन्मान करण्यात येईल, असे सांगितले. त्याचप्रमाणे ७५ टक्केपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या उद्योग, कंपन्यांनाही प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येतील, असे सूचित करण्यात आले.
‘राज्यघटना'ने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून त्याची जाणीव उद्योगात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना करुन देऊन त्यांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि सवलत द्यावी, असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केले. यावेळी उपस्थितांनी मतदानाची सामुहिक शपथ ग्रहण केली.