अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी जीवघेणी कसरत?
वाशी : वाशी सेक्टर-२६ येथील गामी जेड इमारती नजिक असलेल्या मोकळ्या भुखंडातील पडीक जागेत अंमली पदर्थांची विक्री तसेच सेवन केले जात आहे.त्यामुळे या परिसरात अंमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे सक्रिय होत चालले आहे.
नवी मुंबई शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला असून, एपीएमसी परिसर त्याचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. वाशी सेवटर-२६ येथील एकता नगर झोपडपट्टी, कोपरी गाव साईबाबा मंदिर जवळ अंमली पदार्थ विक्री केले जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. आता मात्र या विक्रेत्यांनी याच परिसरात नवीन अड्डा तयार केला असून, याच ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीसह मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सेवन केले जात आहेत.याठिकाणी गामी जेड इमारती जवळ ‘सिडको'चा मोकळा भुखंड आहे. याच भुखंडात एका कोपऱ्यात पडीक बांधकाम असून, याच ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीसह सेवन केले जात आहे.यासाठी तरुण-तरुणी सहा फूट उंचीची भिंत पार करुन आत प्रवेश करतात. त्यामुळे या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार तसेच अपघात देखील होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सदर ठिकाणची पोलिसांनी पाहणी करुन अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.
वाशी सेक्टर-२६ मध्ये कुठे अंमली पदार्थ विक्री केली जात असेल तर त्या जागेची तत्काळ तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी गस्त देखील वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एपीएमसी पोलीस ठाणे.