नवी मुंबईत १.७५ लाखाहून अधिक नागरिक, विद्यार्थ्यांची सामुहिक मतदार शपथ

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४'च्या स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदानाची सामुहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या अंतर्गत महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, महापालिकेच्या आणि खाजगी शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या तसेच विविध आस्थापना या ठिकाणी १.७५ लाखाहून अधिक नागरिक, विद्यार्थी यांनी मतदानाची सामुहिक शपथ घेतली.

सकाळी ठिक  वाजता ही शपथ घ्यायची असल्याने नागरिकांना वेळेचे आकलन व्हावे याकरिता नमुंमपा क्षेत्रात बेलापूर, नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशी सात विभाग कार्यालये आणि बेलापूर, वाशी आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्रे अशा १० ठिकाणी असलेले सायरन सकाळी १०.५९ वाजता वाजविण्यात आले.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी ज्ञानकेंद्रात सामुहिकपणे मतदान शपथ ग्रहण केली. अशाचप्रकारे महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमध्ये सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या समवेत अधिकारी-कर्मचारी यांनी शपथ ग्रहण केली.

त्याचप्रमाणे महापालिकेची ३ रुग्णालये, २ माता बाल रुग्णालये आणि २६ नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणीही शपथ घेण्यात आली. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व स्वच्छता मित्र आणि स्वच्छता सखी, स्वच्छता अधिकारी यांनीही ठिकठिकाणी मतदान शपथ घेतली. विविध उद्यानांमध्ये, जलकुंभ आणि मलप्रक्रिया केंद्रे याठिकाणीही मतदान शपथ घेण्यात आली. अग्निशमन केंद्रे, क्रीडा विभाग, विष्णुदास भावे नाट्यगृह, परिवहन डेपो तसेच महापालिका क्षेत्रातील खाजगी आणि महापालिकेच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येही शपथेचा उपक्रम संपन्न झाला. महापालिका क्षेत्रातील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच विविध आस्थापना याठिकाणीही तेथील अधिकारी-कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेत सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे विविध गृहनिर्माण सोसायटयांमध्येही मतदान शपथेचा उपक्रम राबविण्यात आला.

‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु', अशा आशयाची मतदान शपथ घेत नागरिकांनी २० नोव्हेंबरला मतदान करणारच आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रोत्साहीत करणार, असा निश्चय केला.  

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रमाण सर्वाधिक असावे यादृष्टीने सर्व नागरिकांना मतदान शपथेच्या माध्यमातून एका धाग्याने जोडणारा सामुहिक मतदान शपथेचा उपक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही उत्साहाने राबविण्यात आला. यामध्ये मतदार नागरिकांप्रमाणेच उद्याचे नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राजकारणात संयम, सहनशिलता महत्वाची