बदलापूरकर ठरवणार ‘मुरबाड'चा आमदार
बदलापूर : येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडी, मनसे सह ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सर्वाधिक उमेदवार आणि मतसंख्या बदलापूरची आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदलापूरकराची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघाचा काहीसा ग्रामीण आणि काहीसा शहरी असा संमिश्र चेहरा आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ गलुक्यातील बदलापूर, वांगणी आणि आजुबाजुचा ग्रामीण भाग, कल्याण गलुक्यातील टिटवाळा, नाडगाव परिसराील काही गावे आणि संपूर्ण मुरबाड गलुक्याचा या मतदार संघात समावेश आहे. सुरुवातीपासून काँग्रेस आणि नंतर ‘राष्ट्रवादी'चे वर्चस्व राहिलेला सदर मतदार संघ मागील दोन विधानसभा निवडणुकांपासून ‘भाजपा'च्या ताब्यात आहे. या मतदारसंघात मागील ३ निवडणुकांपासून किसन कथोरे आमदार आहेत. सन २००५ मध्ये पहिल्यांदा ते ‘राष्ट्रवादी'च्या तिकिटावर अंबरनाथ मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००९ मध्ये तत्कालीन आमदार गोटीराम पवार यांना डावलून ‘राष्ट्रवादी'ने त्यांना मुरबाड मतदार संघाची उमेदवारी दिली. त्यानंतर सन २०१४ आणि २०१९ रोजीच्या निवडणुकीत कथोरे विजयी झाले. त्यामुळे यंदा मुरबाड मतदार संघातून सलग चौथ्यांदा कथोरे मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
सन १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपासून १९९५च्या निवडणुकीचा अपवाद वगळता सन २००४ च्या निवडणुकीपर्यंत मुरबाड विधानसभा मतदार संघात माजी आमदार गोटीराम पवार २वेळा काँग्रेस तर २ वेळा ‘राष्ट्रवादी'च्या तिकिटावर निवडून आले आहेत. सन २००९ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी'च्या विकिटावर निवडणूक लढविणाऱ्या किसन कथोरे यांना अपक्ष उमेदवार गोटीराम पवार यांनी जोरदार टक्कर दिली. कथोरे यांना ५५,८३० तर अपक्ष उमेदवार गोटीराम पवार यांना ४९,२८८ मते मिळाली. ‘मनसे'च्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या वामन म्हात्रे यांना ३७,०८० मते मिळाली तर ‘भाजपा'च्या दिगंबर विशे यांना २५,२५८ मते मिळाली.
त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा कथोरे, पवार आणि म्हात्रे आमने सामने आले. या निवडणुकीत ‘भाजपा'चे उमेदवार किसन कथोरे यांना ८५५४३, ‘राष्ट्रवादी'चे उमेदवार गोटीराम पवार यांना ५९,३९३ तर ‘शिवसेना'चे वामन म्हात्रे यांना ५३,४९६ मते मिळाली. ‘काँग्रेस'चे राजेश घोलप यांना ३,४०१ मते मिळाली. त्यानंतर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात ‘भाजपा'चे किसन कथोरे यांना १ लाख ७४ हजार ६८ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ‘राष्ट्रवादी'चे प्रमोद हिंदुराव यांना ३८,०२८ मते मिळाली. या मताधिक्याने किसन कथोरे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणारे उमेदवार ठरले.
यंदाच्या निवडणुकीतही कथोरे असेच मताधिक्य कायम राखतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'ने ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'चे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांना उमेदवारी दिली आहे. ‘मनसे'ने संगीता चेंदवनकर यांना ‘मुरबाड'ची उमेदवारी दिली आहे. ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्ष'चे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी राजीनामा देऊन पक्षाला रामराम केला असून तेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दुसरीकडे मुरबाड मतदारसंघातील मागील अनेक निवडणुकीत बदलापूरकरांची भूमिका निर्णायक ठरली आहे. यदाच्या निवडणुकीतही बदलापूरात मतदार संघात सर्वाधिक दोन लाखाहून अधिक मतदार आहेत.९ उमेदवारांपैकी ‘भाजपा'चे किसन कथोरे, ‘मनसे'च्या संगिता चेंदवनकर आणि ‘राष्ट्रवादी'ला राम राम करुन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले शैलेश वडनेरे, अपक्ष उमेदवार रविंद्र सोनवणे, प्राजक्ता येलवे असे उमेदवार बदलापूरातील आहेत. अशाप्रकारे बहुतांश उमेदवार बदलापूर परिसरातील असल्याने स्वाभाविकच बदलापूरात मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बदलापुरात कुणाकुणामध्ये किती प्रमाणात मत विभागणी होणार, त्याशिवाय मुरबाडसह इतर ग्रामीण भागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने राहणार, याचाही या निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदलापूरकरांचा कौल कुणाकडे राहणार? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.