‘शिंदे सेना'च्या बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर यांची नियुक्ती
नवी मुंबई : ‘शिवसेना शिंदे गट'चे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांची ‘शिंदे सेना'च्या बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पाटकर यांची नियुक्ती केली आहे. आपल्या नियुक्तीनंतर किशोर पाटकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी मोठे शक्ती प्रदर्शन करीत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
‘शिवसेना'च्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत किशोर पाटकर सर्वप्रथम नवी मुंबई महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत किशोर पाटकर यांनी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, ‘सिडको'च्या मोडकळीस (धोकादायक) आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने मांडला आहे. कोव्हीड काळात पाटकर यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना कोविड योध्दा म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रातील किशोर पाटकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘शिवसेना'चे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी त्यांची शिवसेना बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
‘शिवसेना'च्या बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर किशोर पाटकर यांनी पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यानुसार, पक्ष वाढीसाठी आपण कार्य करणार असल्याचे किशोर पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी किशोर पाटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाचे दर्शन घेतले.