महापालिका शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदत वाढ

तुर्भे : नवी मुंबई महापालिका तर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज  स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त (समाज विकास विभाग) किसनराव पलांडे यांनी दिली.

 शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत.  शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्यासाठी अद्यापपर्यंत ३१ हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्याची योजना महापालिका मार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.  

२०२४-२५ वर्षाकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेमध्ये विधवा/घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, महापालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे आणि नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, आदी विविध घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती महापालिका द्वारे वितरीत करण्यात येणार आहे.

विविध घटकाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनेकरिता प्रथम ७ सप्टेंबर, २० ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता या मुदतीत ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या अंतिम दिनांकानंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही, असे महापालिका उपायुक्त (समाज विकास विभाग) किसनराव पलांडे यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदानाचा जागर