जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे शाळेला मोफत संगणक, दिव्यांग प्रशिक्षण साहित्य वाटप
नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण पीठ नाणीज येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा ऐरोली सेवटर-३ मधील श्रीराम विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज मैदान मध्ये नुकताच संपन्न झाला.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांतर्गत संजिवनी विद्यालय, ईश्वरनगर या शाळेला विनामूल्य संगणक तसेच दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत एमबीए फाउंडेशन, ऐरोली या संस्थेला दिव्यांग प्रशिक्षण साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारभी, प.पू. जगद्गुरुश्रींच्या पादुकांची ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या नादात, वारकरी पथक, कलशधारी सुवासिनी, कोळी नृत्य सादर करत, कला परंपरांनी अलंकृत अशी मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये अनेक मान्यवर सिध्द पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
जगद्गुरुश्रीं आपल्या प्रवचनामध्ये जमलेल्या जनसमुदायाला ‘मानवी जन्म किती अमूल्य आहे', याविषयी मार्गदर्शन करत असतात. जीवन सुकर होण्यासाठी आपल्यामध्ये संयम, समयसूचकता, प्रगल्भता, नेतृत्व गुण, खिलाडू वृत्ती, तुमच्यातील आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आदी सर्व गुण आपोआपच विकसित होतील, असे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भवतांना समजावून सांगतात. तसेच ‘दिवसातून दहा मिनिटे वेळ काढा आणि आपल्या मनाला भक्तीरुपी एकाग्रतेचा व्यायाम द्या, स्वप्नात सुध्दा कोणाचे वाईट चिंतू नका या मार्गाने जा', असे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सांगतात.
या सोहळ्यात जनम प्रवचनकार मंगल कुमार चव्हाण यांनी अतिशय सुंदर प्रवचन केले. पादुका दर्शन सोहळ्याला हजाराेंची उपस्थिती होती. या सोहळयात महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांनी केलेली होती. गुरुपादुका पुजनाला आणि दर्शनला सुमारे ५ हजार भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर सर्व भाविकांनी पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि पुष्प वृष्टीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.