रानडुकरांद्वारे भात पिकांचे नुकसान
उरण : यंदा परतीच्या पावसाने भात पिके तयार होण्याच्या अखेरीस दररोज सायंकाळी बरसायला सुरुवात केल्याने भात पिके संकटात सापडली होती. आता पाऊस माघारी गेल्याने शेतकऱ्यांनी भात कापणी, बांधणी, झोडणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, शेतमजुरांच्या अभावी शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या कापणीची कामे लांबली आहेत. शेतमजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भात पिकांमध्ये आता जंगली रानडुकरे, मोकाट गुरे आणि जंगली वानरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे, चिरनेर गावासह परिसरातील अन्य गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांची वक्रदृष्टी पडल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
भातशेती कापणीला आली असताना, मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चिरनेर येथील काही शेतकऱ्यांच्या भात पिकांची रानडुकरांनी एवढी नासाडी केली आहे की, भातपिके कापणी, बांधणीच्या लायक राहिली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या भात पिकांची कापणीच केली नसल्याचे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे, दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकांवर हल्ला करणारी रानडुकरे आणि मोकाट गुरे हिरावून नेत असल्याने मोकाट गुरांचा आणि रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, आवरे, साई, दिघाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, उरण तालुक्यात रानडुकरांपासून भात पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांवर रात्री पहारा देण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, भातपिकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रतिकारात रानडुक्कर मारला गेल्यास शेतकऱ्याविरुध्द शिकारीचा गुन्हा दाखल होत असल्याने कोणीही रानडुकरांचा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत वनखाते, कृषी विभाग, पोलीस खाते तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडे वारंवार प्राण्यांपासून नुकसान होत असल्याच्या लेखी तक्रारी करून देखील या सर्व खात्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून कित्येक वर्ष वेळ मारून नेली आहे, असे उरण तालुवयातील शेतकऱ्यांनी सांगितले.