पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज प्रचार सभा
खारघर: महायुती तर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघर मध्ये आज १४ नोव्हेंबर रोजी सभा होणार असल्यामुळे पनवेल महापालिकेकडून खारघर परिसरातील रस्ते दुरुस्ती, पदपथांची साफसफाई आणि बंद असलेले पथदिवे दुरुस्त केले जात असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
‘भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ‘महायुती'च्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, उरण, पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, महाड आणि नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज १४ नोव्हेंबर रोजी खारघर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला रायगडसह पनवेल आणि नवी मुंबई परिसरातून पन्नास हजारापेक्षा अधिक मतदार उपस्थित राहणार असल्यामुळे पनवेल महापालिका तर्फे खारघर मधील हिरानंदानी ते तळोजा वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले गवत काढण्यात आले आहे. तसेच या मुख्य रस्त्यावरील दुभाजकांची साफसफाई करुन दुभाजकात नवीन झाडे लावण्यात आली आहेत. सभेला रायगड जिल्ह्यातून येणारे मतदार कार तसेच खाजगी बस मधून येणार असल्यामुळे सेंट्रल पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडाची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे विद्युत विभागाकडून दुरुस्त करण्यात आले आहेत. पंतप्रधान खारघर मध्ये येणार असल्यामुळे खारघर मधील रस्त्यांची दुरुस्ती, पदपथांची स्वच्छता आणि बंद असलेले पथदिवे सुरु करण्यात आले असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
खारघर परिसरातील बहुतांश रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडले होते. मात्र, पनवेल महापालिका तर्फे खारघर वसाहत मधील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम सुरु होते. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे हिरानंदानी ते तळोजा मुख्य रस्ता तसेच खारघर सेक्टर-१२, २०, २१ आणि ३० ते ३४ परिसरातील रस्ते दुरुस्तीचे काम वेगाने करण्यात आले आहे.