सिग्नल यंत्रणा बंद; भिवंडीत वाहतूक कोंडी कायम

भिवंडी: भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याबाबत महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने वाहन चालक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी फटका बसत आहे. त्याचबरोबर या परिसरातील प्रदुषणात वाढ होत आहे.

दुसरीकडे शहरातील उड्डाणपुलावर नियमित वाहतूक सुरु असताना त्या खालील वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हणून २ वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाने मुख्य रहदारीच्या मार्गावर लाखो रुपये खर्च करुन सिग्नल यंत्रणा विविध चौकात उभी केली. मात्र, वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये ती यंत्रणा चालविण्यासाठी समन्वय नसल्याने सदर यंत्रणा अद्याप बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा फक्त शोभेचे बाहुले ठरलेली आहे.

मुंबई-नाशिक आणि मुंबई-वाडा या शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रोड मार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात महापालिका अधिकारी, कर्मचारी, वकील, डॉक्टर आणि इतर प्रवासी वाहने तसेच पोलीस अधिकारी सुध्दा जात असतात. मात्र, या वाहतूक कोंडीबाबत सर्व चिडीचुप आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. भिवंडी शहरातील स्व.आनंद दिघे चौक जुना जकात नाका, वंजारपट्टी नाका, स्व.राजीव गांधी चौक, कल्याण नाका आणि भादवड नाका या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे. त्यापैकी वंजारपट्टी येथील सिग्नल यंत्रणा ‘एमएमआरडीए'कडून बसविण्यात आली. तर स्व.आनंद दिघे चौक या ठिकाणी १४ लाख ३० हजार, स्व.राजीव गांधी चौक येथे ९ लाख ३९ हजार तर भादवड येथे ७ लाख २५ हजार रुपये खर्च करुन महापालिकेने ३ ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली आहे. महापालिकेने ३० लाख ९४ हजार रुपये खर्च केले. परंतु, प्रत्येक ठिकाणीची सिग्नल यंत्रणा फक्त उद्‌घाटन दिवशी सुरू झालेली असते. त्यानंतर काही दिवसांत सदर सिग्नल यंत्रणा बंद होते.

गेल्या २० ते ३० वर्षात महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मागणी नुसार अशाप्रकारची सिग्नल यंत्रणा चारवेळा उभारली आहे. मात्र, या यंत्रणा कालांतराने बंद होऊन त्यांना भंगाराचे स्वरुप येते. याप्रकरणी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस शाखा यांच्याकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर प्रत्येकाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलल्याने समस्या दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा त्रास वाढतच आहे. शहरातील नदीनाका ते अंजूरफाटा आणि कल्याण रोड ते मुंबई-नाशिक बायपास मार्ग या दरम्यान अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकलेल्या दिसून येतात. शहरातील अशा विविध समस्यांना कंटाळून अनेक उच्चभ्रू लोकांनी अंजूरफाटा येथे नव्याने झालेल्या वसाहतीमध्ये सदनिका घेतल्या आहेत. त्या ठिकाणी नागरिकांच्या हलक्या वाहनांसाठी नवीन रस्ते बनविले आहेत. मात्र, अंजूरफाटा येथे वाहतूक कोंडी झाल्यानंतर नारपोली वाहतूक पोलीस अवजड वाहनांना खुशाल या नवीन लोकवस्तीमध्ये प्रवेश देऊन महापालिकेने बनविलेले रस्ते खराब करीत आहेत.

शहरातील वाढत्या लोकसंख्येने वाढलेली वाहने आणि यंत्रमाग कारखान्याच्या व्यवसायातील वाहनांचा ताण शहरातील रस्त्यांवर आणि वाहतूक पोलिसांवर असताना शहरात अवजड वाहने मोठ्या संख्येने येत असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यापूर्वी अवजड वाहनांची वाहतूक परस्पर शहरातील उड्डाणपुलावरुन होत असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत नव्हता. परंतु, महापालिकेने अवजड वाहनांना उड्डाणपुलावरुन जाण्यासाठी बंदी केल्याने सर्व वाहने या उड्डाणपुलाखालून शहरातून जात असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊन शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर नेहमी वाहततूक कोंडी होत असते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील वाहतूक कोंडीची विशेष दखल घेऊन प्रचार सभेत भिवंडी वाहतूक कोंडीमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेकडे सुध्दा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील चौकात सिग्नल लगत लावलेले लोखंडी बॅरिकेटस्‌ काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, नियोजन नसल्याने येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. लाखो रुपये खर्च करुन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का? असा सवाल आता पोलीस आणि महापालिका प्रशासनाला विचारत आहे. तर या निवडणूक काळात सदरचा प्रश्न आता मतदार उमेदवारांना विचारीत आहे.

शहरातील जुना मुंबई-आग्रा रोडवर महापालिकेचे मुख्य कार्यालय, तहसील कार्यालय, स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, भिवंडी न्यायालय, भिवंडी एसटी स्टँड, पंचायत समिती अशी महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये आहेत. तर दररोज या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या कामासाठी ये-जा करतात. त्यांना या वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागत आहे. शहरातील नागरिकांकडून, विविध संस्थांकडून अनेक वेळा वाहतूक कोंडीबाबत संबंधितांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, याकडे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. तर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहराबाहेरुन अवजड वाहनांना जाण्यास मार्ग देण्याऐवजी भिवंडी शहरातून अवजड वाहनांना वेळेनुसार प्रवेश दिल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होऊ लागला आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर वाहने अडवून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, अजुनही परिस्थिती ‘जैसे थे'च आहे.

भिवंडी शहरातील मुख्य मार्ग असो की अंतर्गत मार्ग असो, सर्व ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे सिग्नल सुरु केल्यास थांबलेल्या गाडी मागे वाहनांची रांग वाढते. त्यामुळे रस्ते रुंद केल्यास डाव्या बाजुच्या वाहनांना नियमित जाण्याचा मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी सुटू शकते. - सुधाकर खोत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - भिवंडी शहर वाहतूक शाखा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रानडुकरांद्वारे भात पिकांचे नुकसान