नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
गणेश नाईकांनी नवी मुंबईची लावली वाट
नवी मुंबई : ‘भाजपा'चे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा विकास केला नाही, तर या शहराची पुरती वाट लावली आहे. त्यामुळे त्यांना निवडून येण्यासाठी प्रत्येक वेळी इकडून तिकडे उड्या माराव्या लागतात. नाईक यांनी तयार केलेल्या दुषित वातावरणामुळे भूमीपुत्र देशोधडीला लागले आहेत, असा घणाघात ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी'चे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोहर (एम. के.) मढवी यांनी केला.
‘शिवसेना महाविकास आघाडी'च्या वतीने रबालेे येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये एम. के. मढवी यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. कळवा-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील अनेक कारखान्यांमध्ये ८० टक्के कामगार भुमीपुत्र होते. येथील सर्वच कारखाने बंद पाडण्यात आले. कारखान्यांची जागा अंबानी सारख्या उद्योगपतीच्या घशात घालण्यात आली. त्यामुळे भूमीपुत्रांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. घरामध्ये पालकमंत्री, दोन आमदार, एक खासदार आणि महापौर अशी महत्त्वाची पदे असतानाही नाईक यांना गावांचा कोणताच विकास करता आला नाही. नवी मुंबईतील एकाही गावाला त्यांना मैदान देता आले नाही. भूमीपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नाही. त्यामुळे नाईक यांच्या विरोधात भूमीपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कॉलनीमध्ये राहणारे रहिवासी त्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यामुळे नाईक यांचा या निवडणुकीत मोठा पराभव होणार आहे, असे एम. के. मढवी यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. रंजना शिंत्रे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष'चे कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद नाईक, अंकुश सोनावणे, अनिकेत म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज इसवे, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, धोंडीराम पाटील, बालाजी साळवे, युवा सेना सहसचिव करण मढवी, युवा सेना उपसचिव चेतन नाईक, संदेश कांबळे, जमीर पटेल खाजामियाँ पटेल, आदि उपस्थित होते.
धनशक्ती विरुध्द जनशक्ती...
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे. ‘महायुती'मध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडखोरीचा फायदा आपल्यालाच होणार आहे. भूमीपुत्र, झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणारे गोरगरीब, कॉलनी मध्ये राहणारे सर्वसामान्य कुटुंब, सरकारवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील लढाई ‘महाविकास आघाडीच' जिंकणार आहे, असा विश्वासही एम. के. मढवी यांनी यावेळी व्यक्त केला.