नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई
ठाणे: विधानसभा निवडणूक-२०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. ५ वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला आहे.
‘भारत निवडणूक आयोग'मार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ६,९५५ मतदान केंद्रे असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ७७१७ मतदान केंद्राध्यक्ष, ७७१७ मतदान अधिकारी १५,४३४ इतर मतदान अधिकारी अशा एकूण ३०,८६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले आहे. परंतु, अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच यासाठी अनेक जण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशी घ्ोवून तसेच आजारपणाचा दाखला घ्ोवूनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे. ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत, त्यांच्याबाबतीत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्ोतली आहे.
तरीही निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून कर्मचाऱ्यांकडून अशा पध्दतीचे वर्तन अपेक्षित नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य असून अशा प्रकारे जे कर्मचारी निवडणुकीसाठी त्यांना प्राप्त झालेले आदेश नाकारतील, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील अथवा निवडणुकीच्या कामात हयगय करतील त्यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार थेट कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक कार्यालय मार्फत देण्यात आले आहेत.