उड्डाणपुल उभारणीचे संथ काम ठरतेय पादचाऱ्यांना घातक?
वाशी: ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे ८ नोव्हेंबर रोजी कंटेनरच्या धडकेत एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू होण्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत तोवर याच परिसरात पेट्रोल पंपसमोर एका ३० वर्षीय युवकास कंटेनरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अझरुद्दीन पठाण असे मृत युवकाचे नाव असून, तो तुर्भे स्टोअर येथे राहत होता.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरु असून, सदर काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.सदर काम सुरु असल्याने ठाणे येथून पनवेल दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, पनवेल येथून ठाणे दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर प्रवेश दिला आहे. मात्र, या ठिकाणी काम सुरु असून देखील अवजड वाहने जोराने हाकली जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचाऱ्यांना वाहने धडक देत असतात. मागील महिन्यात या ठिकाणी अपघात होऊन एका व्यक्तीच्या पायाला जबर जखम झाली होती. तर ८ नोव्हेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात होऊन रामलाल प्रसाद या ६० वर्षीय वृध्दाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेला २४ तास होत नाहीत तोवर ९ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा या ठिकाणी अझरुद्दीन पठाण या ३० वर्षी युवकाला भरधाव कंटेनरने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे येथील वाढत्या अपघातांच्या घटना पाहता येथील उड्डाणपूलाचे काम होईपर्यंत तुर्भे स्टोअर येथील ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी आता तुर्भे स्टोअर येथील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.