छठपुजेनंतर उल्हास नदीची स्वच्छता

उल्हासनगर: उत्तर भारतीय समाजाचा अत्यंत महत्त्वाचा सण छठ पर्व नुकताच उल्हास नदीकाठी भवतीमय वातावरणात साजरा करण्यात आला. छठपुजेनंतर नदी परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा, पुजेचे साहित्य, प्लास्टिक आदि साहित्यामुळे जलप्रदुषणाची समस्या उभी राहिली. यामुळे नदीच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने आणि पर्यावरणासाठी हानीकारक ठरत असल्याने ‘एस. एस. ग्रुप फाऊंडेशन'च्या प्रमुख सुचित्रा सुधीर सिंग यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबवले.

‘एस. एस. ग्रुप फाऊंडेशन'च्या स्वयंसेवकांनी पाचवा मैल येथील नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यात त्यांनी नदीत उतरुन हाताने कचरा संकलित केला. अंदाजे हजारो टन कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. नदीच्या पाण्याची स्वच्छता आणि शुध्दता कायम राहावी, यासाठी मोहीम अतिशय महत्त्वाची ठरली. सदर ‘स्वच्छता अभियान'मध्ये विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या तरुणांनी जलप्रदुषण रोखण्यासाठी नदीत उतरुन कचरा साफ केला. त्यांच्या मेहनतीमुळे नदी पुन्हा स्वच्छ आणि निर्मळ दिसू लागली.

‘एस. एस. ग्रुप फाऊंडेशन'चे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी या तरुणांच्या कार्याचे कौतुक केले. ‘फाऊंडेशन'च्या माध्यमातून राबवलेल्या सदर उपक्रमामुळे उल्हास नदी पुन्हा एकदा स्वच्छ झाली आहे. ‘एस. एस. ग्रुप फाऊंडेशन'च्या या कार्यामुळे उल्हासनगरवासियांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता वाढली असून जलप्रदुषण रोखण्यासाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

छठ पर्वानंतर उल्हास नदीची स्वच्छता अभियान राबवणे केवळ एक गरज नव्हे, तर आमच्यासाठी एक जबाबदारी आहे. प्रत्येक सण साजरा करताना पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. यंदाच्या छठपुजेनंतर मोठ्या प्रमाणात कचरा नदीत साचला होता, जो जलप्रदुषणाला कारणीभूत ठरु शकला असता. ‘एस. एस. ग्रुप फाऊंडेशन'च्या माध्यमातून या मोहिमेत तरुणांनी जी मेहनत घेतली, ती खरोखर प्रशंसनीय आहे. नदीत उतरुन, प्रत्येकाने स्वतःहुन कचरा संकलित करत नदीला तिचे सौंदर्य परत मिळवून दिले आहे. -सुचित्रा सुधीर सिंग, एस.एस.ग्रुप फाऊंडेशन. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उड्डाणपुल उभारणीचे संथ काम ठरतेय पादचाऱ्यांना घातक?