प्रचार रॅलीमुळे कामगारांच्या हातांना काम
ठाणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. ठाण्या-मुंबईत प्रचाराचा झंझावाताचा श्रीगणेशा ठिकठिकाणी सुरू झाला आहे. प्रचार कार्यात कार्यकर्त्याबरोबरच रोजंदारी तत्वावर माणसे नेमून प्रचार करण्यावर सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार भर देणार आहेत. त्यासाठी प्रचार रॅली, सभा यासाठी माणसांची जमवाजमव सुरु झाली आहे. अशा रॅलींमध्ये व प्रचारात सहभागासाठी रोजंदारी तत्वावर नाका कामगारांचा वापर केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाका कामगारांच्या हातांना निवडणुकीकाळापुरते हा होईना पण सुखाचे काम मिळाले आहे.
जिल्ह्यातील कल्याण, शिळफाटा, आंबेवली, उल्हासनगर, भिवंडी, कळवा नाका, ठाण्यातील वागळे स्टेट, कापूरबावडी, कोपरी आदी भागात रोज शेकडोच्या संख्येने बिगारी काम करणारे कामगार कामाच्या प्रतीक्षेत नाक्यावर उभी असतात. म्हणून या कामगारांना नाका कामगार म्हणून ओळखले जाते.
बांधकाम क्षेत्रात बिगारी हे मुख्य काम करणाऱ्या या कामगारांना ५०० ते ७०० रुपये रोज मिळतो. मात्र प्रचाराच्या धामधुमीत या कामगारांना ८०० ते एक हजार रुपये रोज आणि दोन वेळ जेवण मिळू लागले असल्याची माहिती मिळते. प्रचारासाठी नेल्या जाणाऱ्या नाका कामगारांच्या मुकादमला ऍडव्हान्स पेमेंट देण्यात येत आहे. प्रचार सभात सहभागी होण्यापासून तर प्रचाराची फलक लावण्या पर्यंतची कामे या कामगारांना मिळत आहे. दोन वेळचे जेवण आणि चांगला मोबदला मिळत असल्याने या कामगारांनी काही काळासाठी का होईना पण बांधकाम क्षेत्राकडे पाठ केला असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे बांधकाम क्षेत्रात कामगारांची वानवा भासणार असे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते गटातटात विभागले गेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची भासणारी कमतरता आणि शक्ती प्रदर्शनासाठी गर्दी जमनवण्यासाठी नाका कामगारांची गरज भासत आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत काही काळासाठी का असेना पण नाका कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे अशी प्रतिक्रिया बिगारी कामगार व्यक्त करीत आहेत.