ऐरोली, बेलापूर मतदारसंघात मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांवर भर
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक कार्यालये तसेच नवी मुंबई महापालिका यांच्या वतीने मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत बिंदू माधव नगर दिघा येथील महिला बचत गटांना एकत्रित करुन मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या परिचितांना मतदान करण्याचे आवाहन करावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.
अशाचप्रकारे दिघा विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि स्वच्छता मित्र यांनीही एकत्रीत येत मतदान करण्याचा निर्धार करीत मतदानाची प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली.
ऐरोली येथील चिंचपाडा भागातही मागील निवडणूकीत कमी प्रमाणात मतदान झाले अशा मतदान केंद्रांच्या परिसरात गृहभेटी देत जनजागृती करण्यात आली. तसेच मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
वाशी, सेक्टर-१६ येथील मुख्य चौकात उपस्थित नाका कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले. तर नेरुळ रेल्वे स्थानक, नेरुळ बस डेपो, सेक्टर-१५ अभ्युद्य बँके समोरील रिक्षा स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना एकत्र करुन मतदाना विषयी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात ठेवलेल्या मतदार जनजागृती सेल्फी स्टँडीवर अनेक नागरिकांनी छायाचित्रे काढून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली आणि इतरांनीही मतदान करावे, असे आवाहन केले.
रबाले गांव येथील महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित डॉक्टर, कर्मचारी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत मतदार जागरुकता प्रतिज्ञा घेण्यात आली. त्याचप्रमाणे गोठीवली गांव येथील विश्वास बहुउद्देशीय विकास संस्था मधील महिला सदस्यांशी सुसंवाद साधत त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोलीच्या स्वीप नोडल अधिकारी उपायुक्त अभिलाषा म्हात्रे आणि बेलापूरचे स्वीप नोडल अधिकारी सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.