‘माथेरानची राणी' सुरु

माथेरान : नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन अर्थात ‘माथेरानच्या राणी'तून प्रवासी वाहतूक ६ नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे. पावसाळी सुट्टीनंतर मिनी ट्रेनची शिट्टी, धुर पुन्हा आकाशात पसरला. तब्बल २० दिवस उशिराने सदर सेवा सुरु झाली. दरम्यान, पावसाळ्यानंतरच्या मोसमातील पहिल्या प्रवासी गाडीतून ८८ प्रवाशांनी प्रवास केला. आता आठवड्यातून नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर केवळ ८ गाड्या चालवल्या जाणार आहेत. मात्र, पर्यटकांनी पहिल्या दिवशीच गर्दी करुन मिनी ट्रेन बाबतचे आकर्षण दाखवून दिले.

पर्यटकांची सर्वाधिक लोकप्रिय असणारी माथेरानची राणी मिनी ट्रेनची नेरळ प्रवासी वाहतूक ६ नोव्हेंबर रोजी सुरु झाली. यावेळी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी नेरळ स्थानक येथून निघालेल्या पहिल्या मिनी ट्रेन मधून ८८ प्रवाशांनी प्रवास केला.

पहिली मिनी ट्रेन १० वाजून ४५ मिनिटांनी माथेरान स्थानकात पोहचली. दुसरीकडे मिनी ट्रेन सुरु होत असल्याने पर्यटकांच्या उदंड प्रतिसादामुळे मिनी ट्रेन फुल्ल झाली होती. या गाडीची द्वितीय श्रेणीची सर्व म्हणजे ७२ तिकिटे संपली होती. त्यात प्रथम श्रेणीची सर्व १६ तिकिटे बुक झाली होती. नेरळ हून माथेरान पर्यंत चालवण्यात आलेल्या या मिनी ट्रेनला पहिल्याच दिवशी पर्यटकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्याने १२,८४० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

१५ जून रोजी नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावरील मिनी ट्रेनची प्रवासी सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नेहमीप्रमाणे पावसाळा कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. मात्र, शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरु होती. वास्तविक पावसाळ्यात सुट्टीवर असणाऱ्या मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी सुरु होते. परंतु, यावर्षी सदर सेवा २०दिवस उशिराने म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी सुरु झाली. एनडीएम -४०५ इंजिन लावलेल्या मिनी ट्रेनला एक प्रथम श्रेणी तर तीन द्वितीय श्रेणी एक गार्ड बोगी ते एक लगेज बोगी असे ६ डबे लावण्यात आले होते.

नेरळ माथेरान नेरळ असे चार फेऱ्या या दररोज सुरू असतील,
पावसाळी सुट्टी नंतरच्या पर्यटन हंगामाची सुरुवात होत असलेल्या मिनी ट्रेनच्या पहिल्या गाडीचे चालक पी. के. निराळा, या गाडीसाठी तिकीट तपासणी म्हणून अनुभवी भगत, गाडीचे लोको पायलट भानुदास ठाणगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी असिस्टंट लोको पायलट लक्ष्मण हाबळे, ट्रेन मॅनेजर सचिन पाटील, संजय भगत, रामदास कडव, सुनिल शेळके, पप्पू कुमार, हरीश चिंचोले, ब्रेक पोर्टर स्टाफ इलेक्ट्रिशन, माथेरान स्टेशनचे प्रबंधक विनय कुमार तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही ५ नोव्हेंबर रोजी माथेरानला येऊन गेलो. नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सुरु होणार म्हणून आम्ही ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या मिनी ट्रेनची सफर केली. अत्यंत आनंददायी निसर्गाचे मनमोहक दर्शन अनुभवता आले. लहानपणाची झुकझुक आगीन गाडी पुन्हा अनुभवता आली.
-नलिनी ओढे पर्यटक, पुणे.

वेळापत्रकः
नेरळ-माथेरान-नेरळ, दररोज सकाळी ८.५०, १०.२५.
माथेरान-नेरळ-माथेरान, दररोज दुपारी २.४५, ४.००.
शटल सेवा (माथेरान-अमन लॉज)ः सकाळी ८.२०-८.३८, ९.२०-९.३८, १०.०५-१०.२३, ११.३५-११.५३,
१३.१०-१३.२८, १४.००-१४.१८, १५.१५-१५.३३, १७.२०-१७.३८.
(अमन लॉज-माथेरान) ः ०८.४५-०९.०३, ०९.३५-०९.५३, १०.३०-११.४८, १२.००-१२.१८, १३.३५-१३.५३, १४.२५-१४.४३, १५.४०-१५.५८, १७.४५-१८.०३. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महाविकास आघाडी'चा नक्की उमेदवार कोण?