विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई : ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूव-२०२४'साठी राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४,१४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

‘मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघ'च्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप उपस्थित होते.

राज्यातील लोकसभाच्या १६- नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम२९ ऑक्टोबर असा होता. त्यानुसार २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ७,०७८ इतके नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण २,९३८ अर्ज मागे घेण्यात आले, असे चोवकलिंगम यांनी सांगितले.

मतदार नोंदणीत वाढ...
३० ऑक्टोबर रोजी अद्ययावत मतदारांची संख्या ९,७०,२५,११९ असून यामध्ये पुरुष मतदार ५,००,२२,७३९ तर महिला मतदार ४,६९,९६,२७९ आहे. तर ६,१०१ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ६,४१,४२५ इतकी असून सेना दलातील मतदारांची संख्या १,१६,१७० आहे.

अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात १,१८१ मतदान केंद्रे...
मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात एकूण मतदान केंद्रे १,००,१८६ आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२,६०४ तर ग्रामीण मतदान केंद्र ५७,५८२ इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, आदि शहरांमध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण १,१८१ मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात २१० मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या २४१ इतकी आहे.

ईव्हीएम व्हीव्हीपॅट...
विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. १,००,१८६ इतक्या मतदान केंद्रांसाठी  २,२१,६०० बॅलेट युनिट, १,२१,८८६ कंट्रोल युनिट आणि १,३२,०९४ व्हीव्हीपॅट इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी ५१६६ बॅलेट युनिट, ५१६६ कंट्रोल युनिट आणि ५१६५ व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण १८५ विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.

कायदा-सुव्यवस्था अंतर्गत ४ नोव्हेंबरपर्यंतचा तपशील...
राज्यातील वितरित केलेले एकूण शस्त्र परवाने ७८,२६७ इतके असून जमा करण्यात आलेली शस्त्रास्त्रे ५५,१३६ एवढी आहेत. जप्त करण्यात आलेली शस्त्रे २२९ तर परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली शस्त्रे ५७५ आहेत. परवाना जमा करण्यापासून सूट देण्यात आलेली शस्त्रे १०,६०३  इतकी असून  जप्त करण्यात आलेली अवैध शस्त्रास्त्रे १,२९४ आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ४६,६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विशेष निवडणूक निरीक्षक बालकृष्णन यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा